माझा 42 वर्षांचा राजकीय अनुभव:मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी नक्की बोलेन; सुनील तटकरेंचे सूचक विधान, वादावर मोठे संकेत

0
730-x-548-new-2026-05-16t110833487_1778910139.jpg




अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेतृत्वाची धुरा सुनेत्रा पवार यांनी आपल्या हातात घेतली आहे. मात्र, पक्षात सर्वकाही सुरळीत नसल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. नव्या संघटनात्मक बदलांनंतर पक्षात अंतर्गत नाराजी वाढत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने पार्थ पवार यांच्याबाबत थेट शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी, अशी मागणी त्या नेत्याने केल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील पक्षातील घडामोडींमुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर हजेरी लावली होती. या भेटीनंतर त्यांनी ती फक्त शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचे सांगितले होते. मात्र, या भेटीमागे राजकीय अर्थ शोधले जाऊ लागले. दरम्यान, या सर्व घडामोडींमध्ये आता सुनील तटकरेंनी केलेले वक्तव्य विशेष चर्चेत आले आहे. माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास आहे. मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी नक्की बोलेन, असे सूचक विधान त्यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. योग्य वेळ आल्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करेन, असेही तटकरे यांनी म्हटल्याने त्यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. तटकरेंनी पुढे पक्षातील सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसून मार्ग काढतील, असे स्पष्ट केले. प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, वळसे पाटील, छगन भुजबळ आणि आम्ही सर्वजण एकत्र चर्चा करू. प्रत्येक पक्षात काही मतभेद किंवा घटना घडत असतात. मात्र चर्चेतून त्यावर तोडगा निघतो, असे ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि एनडीए अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शरद पवारांनी बोलणे टाळले दरम्यान, शरद पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून त्यांना सुनील तटकरे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी या विषयावर भाष्य करण्याचे टाळले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढत्या चर्चांमुळे आगामी काळात पक्षात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीपासून ते नेतृत्वाच्या नव्या समीकरणांपर्यंत अनेक मुद्द्यांवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed