ठिबकच्या जाळ्यात अडकलेल्या दोन हरणांना जीवदान‎:पाळधी परिसरातील शेतकरी व प्राणिमित्रांनी दाखवली माणुसकी‎

0
246_17785024866a01cb56ee670_50e6225619f14a9884f3e1ea92ee6ab2v1.jpg




जामनेर तालुक्यातील पाळधी परिसरातील माळप्रिंपी रस्त्यावर असलेल्या एका शेतात ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये शिंगे अडकून पडलेल्या दोन काळविटांना शेतकरी आणि प्राणी मित्रांच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले आहे. अमजद अब्बास पठाण यांच्या शेतात ठिबकच्या नळ्यांमध्ये दोन काळविटांची शिंगे एकमेकांत आणि नळ्यांमध्ये घट्ट अडकली होती. सुटकेसाठी हे दोन्ही मुके प्राणी बराच वेळ तडफडत असल्याने अत्यंत थकलेल्या अवस्थेत होते. ही बाब शेजारील शेतकरी निळकंठ शिवदास माळी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ स्थानिक सर्पमित्र व प्राणी मित्र नाना माळी यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच नाना माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन्यप्राणी बिथरलेले असतानाही त्यांनी अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळली आणि काळजीपूर्वक ठिबकच्या नळ्या कापून दोन्ही काळविटांची सुटका केली. मुक्त होताच या दोन्ही प्राण्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. या घटनेची माहिती जामनेर वन विभागाचे कर्मचारी अशोक ठोंबरे यांना देण्यात आली. ऐन उन्हाळ्यात तहान-भुकेने व्याकुळ झालेल्या या मुक्या जीवांना वेळेवर मदत करून जीवदान दिल्याबद्दल शेतकरी आणि प्राणी मित्रांचे परिसरातून कौतुक होत आहे. ठिबकमध्ये अडकलेल्या काळविटांची सुटका करताना प्राणिमित्र. शेतात ठिबकच्या नळ्या किंवा तारांचे कुंपण असल्यास, वन्यप्राणी अडकण्याची शक्यता असते. अशा वेळी प्राणी बिथरलेले असतात, त्यामुळे त्यांच्या जवळ जाताना सावधगिरी बाळगावी आणि तज्ज्ञांना बोलवावे. वन्यप्राणी लोकवस्तीत किंवा शेतात अडकल्यास त्यांना इजा न करता तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा. पाळधीच्या घटनेत दाखवलेली माणुसकी इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed