शिवसेना नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला:बंदुकीच्या दस्ताने चेहऱ्यावर प्रहार; राजकीय वर्तुळात खळबळ

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-11t183010287_1778504455.jpg




महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. मात्र महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अनेक ठिकाणी अंतर्गत वाद असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. बदलापूरच्या कात्रप परिसरात एका हळदी समारंभात राजकीय वैमनस्यातून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुळावर बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाचे नाक फ्रॅक्चर जाले असून, या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रोहण पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी या दोन्ही गटांवर बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर येथील कात्रप परिसरात एका हळदी समारंभातून बाहेर पडत असताना भाजप पदाधिकारी मारुती पाटील यांचे चिरंजीव सनी पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रोहन पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी सनी पाटील यांना गाठून त्यांच्याशी वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, आरोपींनी बंदुकीच्या पाठीमागच्या दस्ताने सनी यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर जबर प्रहार केले. या भीषण हल्ल्यात सनी पाटील गंभीर जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकीय वैमनस्यातून हल्ला या हल्ल्यामागे जुन्या राजकीय वैमनस्याचा संदर्भ असल्याचे सनी यांचे भाऊ दिनेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मारुती पाटील यांनी यापूर्वी रोहन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, याच निवडणुकीचा राग मनात धरून हा पूर्वनियोजित कट रचण्यात आल्याचा आरोप पाटील कुटुंबाने केला आहे. भरवस्तीत आणि सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळातही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पोलिसांनी निष्पक्षपणे कारवाई करावी- राजेंद्र घोरपडे या घटनेनंतर बदलापूर पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारीची दखल घेत परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक न झाल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी कोणत्याही दबावाखाली न येता निष्पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रोहन पाटील ‘नॉट रिचेबल’ दुसरीकडे, या गंभीर आरोपांबाबत शिवसेना गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मारहाणीचा आरोप असलेले नगरसेवक रोहन पाटील सध्या ‘नॉट रिचेबल’ असल्याचे समजते. हे संपूर्ण प्रकरण राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असल्याने बदलापूर पोलिसांनी सध्या तरी कॅमेऱ्यासमोर कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यास नकार दिला आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पोलिस या तपासात पुढे काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed