निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक?:संजय शिरसाटांचा थेट आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र; आज न्यायालयात हजर करण्यात येणार
![]()
नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराच्या आरोपांमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय रंग चढताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार माजी खासदार इम्तियाज जलील असल्याचा थेट दावा त्यांनी केला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना निदा खान ही केवळ सामान्य आरोपी नसून ती ‘पेड वर्कर’ असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, या प्रकरणामागे संघटित पद्धतीने काम केले गेले असून आरोपींना राजकीय पातळीवरून मदत मिळाल्याचा संशय आहे. शिरसाट यांनी असा दावा केला की, एमआयएमच्या एका नगरसेवकाने निदा खानला लपण्यासाठी आसरा दिला होता. ज्या घरात ती राहत होती ते घरही अनधिकृत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या जागेवर लवकरच कारवाई होऊ शकते, असे संकेतही त्यांनी दिले. या आरोपांमुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. निदा खान आणि इम्तियाज जलील यांच्यातील नातेसंबंध याचवेळी संजय शिरसाट यांनी निदा खान आणि इम्तियाज जलील यांच्यातील नातेसंबंधांबाबतही मोठा दावा केला. निदा खान ही इम्तियाज जलील यांच्या भावाच्या पत्नीची नातेवाईक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात जलील यांचा थेट संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिल्याची माहिती त्यांनी दिली. आता या गंभीर आरोपांवर इम्तियाज जलील काय भूमिका घेणार आणि त्यांचे उत्तर काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मतीन पटेल यांचे नगरसेवक पदही धोक्यात – महापौर निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने मतीन पटेल यांच्या नारेगाव परिसरातील त्यांचे दुसरे निवासस्थान आणि कार्यालयालाही नोटीस देण्यात आली आहे. महापौर समीर राजूरकर यांनी या प्रकरणावर भाष्य करत मतीन पटेल यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले. महाराष्ट्र पालिका कायद्यातील कलम 10(1)(ड) अंतर्गत कारवाई होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी आक्षेप घेतला आहे. मतीन पटेल यांना महापौरांनी नव्हे तर जनतेने निवडून दिले आहे, त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्याचा अधिकार महापौरांना नाही, असे त्यांनी म्हटले. घरावरील नोटीसविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर दरम्यान, नाशिकमधील टीसीएस प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. या प्रकरणात लैंगिक शोषण, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि सक्तीच्या धर्मांतराचे प्रयत्न अशा गंभीर आरोपांखाली आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निदा खान 26 मार्चपासून फरार होती. अखेर नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला नरेगाव परिसरातील कैसर कॉलनीमधून ताब्यात घेतले. तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. दबाव आणल्याचे पुरावे तपासात पीडित तरुणीचे नाव बदलण्याचा प्रयत्न, धार्मिक प्रभाव टाकण्यासाठी 171 लिंक पाठवणे आणि विशिष्ट धार्मिक पद्धती स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचे पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. एसआयटी या सर्व बाबींची सखोल चौकशी करत असून आरोपींच्या संपर्कातील व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडिया कनेक्शनची माहितीही तपासली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात मोठे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटताना दिसत आहेत. आज नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात येणार
निदा खानची पोलिस कोठडी संपत असल्याने तिला आज नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस कोठडीदरम्यान तिची स्वतंत्र चौकशी तसेच कुटुंबीयांसमोर बसवून विचारपूस करण्यात आली आहे. तपासातून कोणती माहिती समोर आली आणि पुढे कोणत्या दिशेने तपास होणार, याचा आढावा सरकारी पक्ष न्यायालयात मांडणार आहे. पोलिसांकडून तिच्या कोठडीत वाढ मागितली जाण्याची शक्यता असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
