MP Nilesh Lanke Health Worsens; Shifted to Pune from Ahilyanagar
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांची प्रकृती आज सकाळी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना पुढील उपचार व वैद्यकीय तपासण्यांसाठी तातडीने पुणे येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
.
नीलेश लंके गत काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर अहिल्यानगर येथीलच एका रुग्णालयात मागील 2-3 दिवसांपासून उपचार सुरू होते. पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अखेर आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या तपासण्या व पुढील उपचार होणार आहेत. या घटनाक्रमामुळे नीलेश लंके यांच्या समर्थकांसह अनेकांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या खासदार नीलेश लंके यांची प्रकृती स्थिर आहे. पुण्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
कोण आहेत खासदार नीलेश लंके?
नीलेश लंके यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झाली. ते पारनेरचे शिवसेना तालुकाप्रमुख होते. 2018 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षातून डच्चू दिला. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते पारनेर विधानसभा मतमदारसंघातून विधानसभेवर गेले. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात उभी फूट पडली. अनेक आमदार व नेते अजित पवारांसोबत गेले. नीलेश लंके यांचाही त्यात समावेश होता. पण नंतरच्या कालावधीत ते पुन्हा शरद पवारांकडे परतले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटातर्फे त्यांनी अहिल्यानगर लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी भाजपचे तत्कालीन खासदार सुय विखे यांचा पराभव केला. नगरमधल्या 3 मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार होते. त्यामुळे त्यांची ताकद या मतदारसंघात होतीच. शिवाय रोहित पवारांनीही नीलेश लंकेंसाठी जोर लावला होता. शेवटी नीलेश लंके यांनी या मतदारसंघात पवारांना विजयश्री मिळवून दिला. लंके यांनी अटीतटीच्या लढतीत 28 हजार मतांनी सुजय विखेंचा पराभव केला.
हे ही वाचा…
KPIT चे अध्यक्ष रवी पंडित यांचे निधन:वयाच्या 75 वर्षी घेतला अखेरचा श्वास; नवोन्मेष, मूल्याधिष्ठित कार्यपद्धतीचा अध्याय संपुष्टात

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी केपीआयटी टेक्नोलॉजीचे अध्यक्ष तथा निष्णाता सीए डॉक्टर एस बी (रवी) पंडित यांचे आज पहाटे 5 च्या सुमारास पुणे येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या रुपाने केवळ एका यशस्वी उद्योगपती किंवा सीएचा काळाच्या पडद्याआड गेला नाही, तर दूरदृष्टी, नेतृत्व, नवोन्मेष व मूल्याधिष्ठित कार्यपद्धती यांचा एक प्रेरणादायी अध्याय संपुष्टात आल्याची भावना व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर
