
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जयंती तिथीप्रमाणे शिवसृष्टीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी उपस्थिती लावली.
.
प्रवीण तरडे यांनी शिवसृष्टीला भेट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आपण परदेशातील पर्यटनस्थळे आणि संग्रहालये पाहिल्यावर तिथल्या इतिहासाच्या मांडणीने, भव्यतेने आणि स्वच्छतेने हरखून जातो. पुण्यातील शिवसृष्टीमधील जिवंतपणा आणि भव्यता परदेशातील संग्रहालयांच्या दर्जाची आहे.”
तरडे पुढे म्हणाले, “शिवसृष्टी उभी रहावी हे बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न होते. आज हे स्वप्न प्रत्यक्षात अनुभवताना अंगावर काटा आला. अवघ्या २-३ तासांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य अनुभवायचे असेल तर प्रत्येकाने शिवसृष्टीला भेट द्यायलाच हवी.”
या कार्यक्रमाला प्रवीण तरडे यांच्या पत्नी व अभिनेत्री स्नेहल तरडे, ढोले पाटील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, त्यांच्या पत्नी उमा ढोले पाटील, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त अमृत पुरंदरे, विनीत कुबेर आणि शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार उपस्थित होते.
प्रवीण तरडे यांनी शिवसृष्टीतील अनुभवाबद्दल सांगताना म्हटले, “महाराजांना अपेक्षित असलेले स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा हे तत्त्व इथे येऊन समजून घेता आले. महाराजांनी जे किल्ले उभे करायला तहहयात घालविली ते किल्ले, त्यांचे महत्त्व, त्यावरील लढाया येथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाहता येतात.”
तरडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “येणाऱ्या नव्या पिढ्यांना शिवाजी महाराज जसे आहेत तसे दाखविण्याचे सामर्थ्य अत्याधुनिक पद्धतींच्या वापराने या शिवसृष्टीत उभे केले आहे. आपण एखाद्याच्या वाढदिवसाला भेटवस्तू देतो, त्याऐवजी शिवसृष्टीचे तिकीट देऊन आपला हा इतिहास घराघरांत पोहोचवूयात.”
