
सराईत चोरट्यांकडून जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी, चेन स्नॅचिंगसारखे २३ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या दोन सराफांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 52 लाख 50 हजार रुपये कि
.
सातारा जिल्ह्यातील दरोडा घरफोडी चेन स्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सचिन यंत्र्या भोसले (वय 30, रा. फडतरवाडी, ता. जि. सातारा), नदीम धर्मेंद्र काळे (वय 22, रा. तुजारपूर, ता. वाळवा, जि. सांगली) या सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. एकूण सात जणांची टोळी असून सचिन भोसले हा टोळीचा म्होरक्या आहे. अन्य पाच जण हाती लागलेले नाहीत. दरम्यान, चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या आशिष चंदुलाल गांधी (वय 39, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि संतोष जगन्नाथ घाडगे (वय 48, रा. देगाव, ता. जि. सातारा) यांनाही अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील दरोडा, चैन स्नॅचिंग, जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर आपल्या खबऱ्याकडून माहिती काढत असताना टोळीचा म्होरक्या सचिन यंत्र्या भोसले हा त्याच्या साथीदारासह जिहे (ता. जि. सातारा) येथे येत जात असल्याचे समजले. त्यानंतर अनेक दिवस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने पेट्रोलिंगद्वारे त्याच्यावर पाळत ठेवली. तसेच फळ विक्रेते बनून पाठलाग करुन त्याच्या मुसक्या आवळल्या.
चोरीचे दागिने घेणाऱ्या सराफ दुकानदारांकडे तपास करत असताना सराफ सुवर्णकार समितीचे उमेश बुऱ्हाडे, प्रथमेश नगरकर (पुणे) आणि शशिकांत दीक्षित (सातारा) यांनी अडथळे आणले. दागिने हस्तगत होऊ नयेत म्हणून प्रयत्न केले. मोर्चा काढून दबाव टाकत तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी आशिष गांधी आणि संतोष घाडगे या सराफांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संशयित आरोपी सचिन यंत्र्या भोसलेच्या टोळीवर सातारा जिल्ह्यातील मसूर, उंब्रज आणि फलटण शहर पोलिस ठाण्यात प्रत्येकी 3, मल्हारपेठ, औंध, कराड ग्रामीण आणि सातारा ग्रामीण पोलिस ठाण्यात प्रत्येकी 2, कराड शहर, वडूज, पुसेगाव, लोणंद आणि खंडाळा पोलिस ठाण्यात प्रत्येकी 1 गुन्हा नोंद आहे. या टोळीने 1 दरोडा, 8 चैन स्नॅचिंग, 3 जबरी चोरी, 8 घरफोडी, 3 इतर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.