सडपातळच्या नादात ‘वेट लॉस’ इंजेक्शन ठरू शकते जीवघेणे:चरबीऐवजी शरीरातील उपयुक्त स्नायूंची 40 टक्क्यांपर्यंत घट; 50% रुग्णांना गंभीर त्रास
![]()
देशात आणि राज्यात सध्या झटपट सडपातळ दिसण्यासाठी “वेट लॉस इंजेक्शन्स’ घेण्याचे फॅड कमालीचे वाढले आहे. सोशल मीडियावरील सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सच्या जाहिरातींमुळे तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होत आहे. मात्र, या इंजेक्शन्सचा वापर जितका सोपा वाटतो, तितकाच तो जोखमीचा आहे. वैद्यकीय संशोधनानुसार, ही इंजेक्शन्स घेणाऱ्या दर दोनपैकी एका व्यक्तीला (५०%) कोणत्या ना कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे असे उपचार करण्यापूर्वी आधी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. चरबीऐवजी ४०% स्नायूच घटतात जीएलपी-१ प्रकारातील (उदा. सिमाग्लुटाइड, लिराग्लुटाइड) औषधांच्या क्लिनिकल चाचण्यांनुसार, या इंजेक्शन्समुळे होणाऱ्या त्रासाची आकडेवारी चिंताजनक आहे. साधारणपणे ३० ते ४५% रुग्णांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होतो, तर १५% रुग्णांना पोटाचे गंभीर विकार जडतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या इंजेक्शन्समुळे जे वजन कमी होते, त्यातील ३० ते ४०% वजन हे चरबीऐवजी शरीरातील उपयुक्त स्नायूंचे असते, जे भविष्यात शरीराला अत्यंत कमकुवत बनवते. “अॅस्पिरेशन न्यूमोनिया’ सारखा धोका: डॉ. भास्कर बॅरिएट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले की, ही औषधे केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नसून ती एका ठराविक वैद्यकीय स्थितीसाठी आहेत. शस्त्रक्रियेपूर्वी ही औषधे न थांबवल्यास “अॅस्पिरेशन न्यूमोनिया’ सारखा जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो. लग्नापूर्वी सडपातळ दिसण्यासाठी उपचार: डॉ. शाह बॅरिएट्रिक सर्जन डॉ. शशांक शाह यांच्या मते, भारतीय कंपन्यांनी स्वस्त पर्याय उपलब्ध केल्यामुळे विशेषतः लग्नकार्यापूर्वी सडपातळ दिसण्यासाठी तरुणींमध्ये याची लोकप्रियता वाढली आहे. मात्र, स्वतःहून औषधे घेतल्यास हार्मोनल संतुलन बिघडू शकते. इंजेक्शन घेण्यापूर्वी हे वाचाच! प्रश्न: ही इंजेक्शन्स नक्की काय करतात?
– ही औषधे मेंदूला “पोट भरल्याची’ खोटी जाणीव करून देतात आणि पचनक्रिया मंदावतात. यामुळे भूक कमी लागते. प्रश्न: याचे दुष्परिणाम काय आहेत?
-चक्कर येणे, थकवा आणि पोटदुखी यासारखे तात्पुरते त्रास होतात. मात्र, दीर्घकाळ वापरल्यास पित्ताशयात खडे होणे किंवा स्वादुपिंडाला सूज येणे यासारखे १ ते ३% गंभीर धोके संभवतात. प्रश्न: इंजेक्शन थांबवल्यानंतर काय होते?
– जर औषधांसोबत योग्य आहार आणि व्यायामाची जोड नसेल, तर इंजेक्शन बंद केल्यावर पुन्हा वेगाने वजन वाढण्याची शक्यता सर्वाधिक असते.
