पुण्यात आता तंत्रज्ञानाधारित शेतीचे धडे:20 गुंठे जागेत साकारला मॉडेल कृषी प्रकल्प, ॲग्रीकल्चर ट्रस्ट, रोबोटिक्ससोबत सामंजस्य करार

0
7d3bb627-ebda-470a-8c49-a9fcf379f2f9_1777093248922.jpg




युवकांचे मातीशी नाते कायम राहावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत क्रांती घडवता यावी, या उद्देशाने विद्यार्थी सहायक समितीने पुढाकार घेतला आहे. समितीच्या संकुलात तंत्रज्ञानाधारित कृषी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले असून, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि डिजिटेक रोबोटिक्स इंजिनिअरिंग यांच्याशी दोन विशेष सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या करारांमधून कृषी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून युवकांसाठी अधिक संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थी सहायक समितीच्या शिवाजी हौसिंग सोसायटी येथील लतिका गायतोंडे वसतिगृहाच्या संकुलातील २० गुंठे जागेवर या कृषी प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बारामती कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ संतोष करंजे, बारामती कृषी व संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष रासकर, उद्यानविद्या विभागाचे प्रा. मच्छिंद्र आगळे, डिजिटेक रोबोटिक्सचे प्रमुख अजीत गटे, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, वीएसएस फाऊंडेशन अमेरिकाच्या अध्यक्ष अंजली अंतूरकर आणि समितीच्या विश्वस्त डॉ. ज्योती गोगटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विशेषज्ञ संतोष करंजे यांनी माहिती दिली की, पुढील तीन वर्षांच्या काळात ट्रस्टतर्फे ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना समितीच्या प्रयोगशाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. माती परीक्षणापासून ते कृषी विपणनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा आणि लहान जमिनीतूनही अधिक उत्पन्न कसे मिळवायचे, याचे मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या ज्ञानाचा प्रसार करावा आणि आपल्या गावाकडील शेतीत तंत्रज्ञानाधारित मॉडेल उभारावीत, असे आवाहन त्यांनी केले. रोबोटिक्स सेंटरविषयी अजीत गटे आणि सुप्रिया केळवकर यांनी माहिती दिली. समितीच्या संकुलात या केंद्रासाठी साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागेत पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. येथील प्रशिक्षण अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या त्रिस्तरीय ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाईल. यशस्वी विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची संधी मिळेल. हे प्रशिक्षण समितीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच इतर विद्यार्थ्यांसाठीही खुले असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed