
औंढा नागनाथ शिवारातील आखाड्यावर मारहाण करून लुटणाऱ्या चौघांपैकी दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व औंढा पोलिसांच्या पथकाने शनिवारी ता. २६ अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरीत दोघांचा शोध सुरु असून त्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला तांडा शिवारात रविवारी ता. २० पहाटेच्या सुमारास चार चोरट्यांनी एका शेतातील आखाड्यावर जाऊन तेथील शेतकऱ्याला व त्यांच्या पत्नीला मारहाण करून १.०६ लाख रुपये किंमतीचे दागिने पळवले होते. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असतांनाच दोन दिवसापुर्वी औंढा नागनाथ शिवारात चार चोरट्यांनी दोन आखाड्यांवर शेतकऱ्यांना मारहाण करून महिलांच्या अंगावरील ५० हजाराचे दागिने पळवले होते. या प्रकरणीही औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी पथक स्थापन केले होते. यामध्ये औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, माधव जिव्हारे, उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, दिलीप मोरे, जमादार संदीप टाक, गिरी, रविकांत हरकाळ यांच्या पथकाने माहिती घेण्यास सुरवात केली होती.
यामध्ये हिंगोली तालुक्यातील दोघे जण सोने विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी आज पहाटे एका ठिकाणी छापा टाकून अनिल काळे व अशोक काळे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून औंढा नागनाथ शिवारातील आखाड्यावरील लुटलेला काही मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात आणखी दोघांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरिकांनी सतर्कता बाळगावी – श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक हिंगोली
शेतातील आखाड्यावर लुटीच्या घडलेल्या दोन घटना लक्षात घेता आखाड्यावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, मौल्यवान वस्तू व रोख रक्कम सोबत बाळगू नये. शेतातील आखाड्याकडे येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबाबत संशय आल्यास असल्यास तातडीने डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.