![]()
हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्हॅन आणि ऑटो चालकांची एक महत्त्वाची बैठक गुरुवारी १८ पार पडली. या बैठकीचा मुख्य उद्देश शाळेत ये-जा करणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे हा होता. चालकांनी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसून वाहतूक करू नये यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी केल्या. येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालक ऑटो चालकांची बैठक घेण्यात आली यावेळी पोलिस अधीक्षक निलाभ रोहण यांनी मार्गदर्शन केले. जर एखाद्या बालकासोबत चुकीचा प्रकार होत असल्याची माहिती मिळाली किंवा तशी शंका आली, तर त्याबाबत त्वरित पोलिस स्टेशनला कळवणे आता ऑटो आणि व्हॅन चालकांसाठी पोक्सो कायदा कलम १९ अन्वये बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता वाहन चालक केवळ मुलांना शाळेत पोहोचवण्याचे काम न करता, त्यांच्या सुरक्षिततेचे रक्षक म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त, बैठकीत बालकांच्या सुरक्षित प्रवासासाठी काही कडक नियमही लागू करण्यात आले आहेत. चालकांनी आपले चालक परवाना आणि वाहनाची कागदपत्रे नेहमी सोबत ठेवणे आवश्यक आहे, तसेच आपला फोटो, मोबाईल क्रमांक आणि पत्ता संबंधित शाळा व पालकांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवास करताना चालकांनी फोनवर बोलू नये, वेगाने गाडी चालवू नये आणि क्षमतेपेक्षा जास्त मुलांना वाहनामध्ये बसवून वाहतूक करू नये, अशा कडक सूचना डॉ. निलाभ रोहन यांनी दिल्या आहेत. मुलांना शाळेतून घरी सोडताना केवळ पालकांच्या ताब्यात किंवा सुरक्षित आणि निश्चित केलेल्या ठिकाणीच सोडावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीला अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, पोलिस उपाधिक्षक मयूर रसाळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, दामिनी पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुमारे ५० पेक्षा अधिक शालेय व्हॅन आणि ऑटो चालकांची उपस्थिती होती. पोलिस प्रशासनाच्या या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गांभीर्याने हाताळला जाणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. पोलिसांकडून विद्यार्थी वाहतुकीच्या प्रश्नावर लक्ष दिले जाणार असल्याने पालकांचा ताण दूर होणार आहे.
हिंगोली पोलिस अधीक्षकांकडून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले:क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक न करण्याच्या सूचना
