[ads1]
![]()
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (जीएमसी) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नसल्याने शंभर वर्षे जुन्या विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची (व्हीएमव्ही) इमारत तात्पुरत्या स्वरूपात होस्टेलसाठी मागितली आहे. या मागणीला व्हीएमव्हीची माजी विद्यार्थी संघटना आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (एआयएसएफ) तीव्र विरोध दर्शवला आहे. जीएमसीने व्हीएमव्हीकडे होस्टेलसाठी इमारत देण्याची मागणी केली असून, या मागणीची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा एआयएसएफने दिला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनानेही कोणतीही शहानिशा न करता या मुद्द्याला अप्रत्यक्षपणे समर्थन दिले आहे. यामुळे व्हीएमव्हीची माजी विद्यार्थी संघटना आणि एआयएसएफने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. एआयएसएफच्या राज्य सचिव प्रतीक्षा ढोके यांच्या नेतृत्वाखालील एका प्रतिनिधीमंडळाने व्हीएमव्हीच्या संचालकांची भेट घेऊन यासंदर्भात लेखी निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, मुळात व्हीएमव्हीच्याच सर्व विद्यार्थ्यांना तेथे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही. इमारती नादुरुस्त असल्याने गेल्या दोन वर्षांपासून काही विद्यार्थ्यांना शहरात भाड्याने खोल्या घेऊन राहावे लागत आहे. अशा स्थितीत आधी व्हीएमव्हीच्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. एआयएसएफच्या माहितीनुसार, व्हीएमव्ही परिसरातील काही जागा एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी पाच वर्षांच्या करारावर देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. संबंधित विभागाकडून तसा अधिकृत प्रस्ताव प्राप्त झाला आहे का, याबाबत प्रशासनाने तातडीने स्पष्टता द्यावी आणि असा प्रस्ताव असल्यास तो रद्द करावा, अशी मागणी एआयएसएफने केली आहे. संस्थेच्या जमिनीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आजी-माजी विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, शिक्षक व कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्यावे, असेही निवेदनात नमूद आहे. व्हीएमव्हीकडे मोठी शासकीय जमीन असल्याने यापूर्वीही शासकीय यंत्रणांनी या परिसरातील जागेची मागणी केली आहे. याआधी पोलीस विभागाला काही जागा दिली गेली होती, जिथे आता गाडगेनगर पोलीस ठाणे वसले आहे. असेच होत राहिल्यास व्हीएमव्हीच्या मूळ अस्तित्वाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एआयएसएफच्या राज्य सचिव प्रतीक्षा ढोके यांनी सांगितले की, “एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना होस्टेलची सोय उपलब्ध करून देण्यास आमचा विरोध नाही. पण त्यांची नावे पुढे करून व्हीएमव्हीची जमीन बळकावण्याचा प्रकार होऊ नये. त्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी स्वतंत्र शासकीय जागा उपलब्ध करून देत तेथे वसतिगृह उभारण्यात यावे आणि व्हीएमव्हीच्या जमिनीचे संरक्षण करावे.”
[ads2]
जीएमसीने व्हीएमव्हीची इमारत होस्टेलसाठी मागितली:शंभर वर्षे जुन्या संस्थेच्या इमारतीला माजी विद्यार्थी संघटना आणि एआयएसएफचा तीव्र विरोध
















Leave a Reply