महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभाग व लक्ष्मीबाई मागासवर्गीय महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मौर्य नारनाळी व रूई ता. कंधार येथे महात्मा गांधी व्यसनमुक्ती अभियानांतर्गत संगीत रजनी व समाजप्रबोधन कार्यक्रम नारनाळी व रूई तालुका कंधार या दोन ठिकाणी संपन्न झाला
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर व्यसनमुक्ती या विषयावर प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी शाहीर साहेबराव वाघमारे नरंगलकर, शाहीर रमेश गिरी, ढोलकीवादक सुशांत वाघमारे, गायिका सुवर्णा वाघमारे, वंदना खरात व मधुकर लांडगे यांनी शाहिरीच्या माध्यमातून गीत, पोवाडे सादर करून व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली. दारू, बिडी-सिगारेट, तंबाखू, नशेचे पदार्थ व गांजा यांसारख्या घातक पदार्थांमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देण्यात आली.
युवकांना व्यसनापासून दूर ठेवून सक्षम राष्ट्रनिर्मिती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. युवक, महिला बचत गट व ग्रामस्थांनी या समाजप्रबोधनपर उपक्रमाचे स्वागत करून आयोजकांचे अभिनंदन केले.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि लक्ष्मीबाई मागासवर्गीय महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर व्यसनमुक्ती व समाजजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.






Leave a Reply