पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची 1.17 कोटींची फसवणूक:दहशतवादी संघटनेशी संबंधाची बतावणी करत सायबर चोरट्यांकडून गंडा
![]()
दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची बतावणी करून औंध येथील एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी 1 कोटी 17 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिसठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक 13 मार्च ते 22 एप्रिल या कालावधीत घडली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. समाज माध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करून त्यांनी संवाद साधला. यावेळी चोरट्यांनी पोलिसांसारखा गणवेश परिधान केला होता. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला एका दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे भासवले आणि त्यांच्या बँक खात्यातून दहशतवाद्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित झाल्याचे सांगितले. अटकेची भीती दाखवून चोरट्यांनी ज्येष्ठाकडे पैसे जमा करण्याची मागणी केली. घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी वेळोवेळी 1 कोटी 17 लाख 87 हजार रुपये चोरट्यांनी दिलेल्या खात्यात जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिसनिरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत. केंद्रीय तपास संस्थांच्या नावाने कारवाईची भीती दाखवून नागरिकांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. अशा बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक दरम्यान, शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोथरूड येथील 57 वर्षीय मनोज अग्रवाल यांची 3 लाख 39 हजार 750 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी व्हॉट्सअॅप मोबाईलधारक, ‘ग्लोबल अफेक्स इंडिया’ कंपनीचे एजंट आणि विविध बँक खातेधारकांविरुद्ध कोथरूड पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 सप्टेंबर 2025 ते 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आरोपींनी अग्रवाल यांना व्हॉट्सअॅप कॉल करून स्टॉक मार्केटबद्दल माहिती दिली. त्यांनी स्वतःला शेअर ट्रेडिंग कंपनीचे एजंट असल्याचे भासवून अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ट्रेडिंग खाते उघडण्यास सांगून गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळोवेळी 3 लाख 39 हजार 750 रुपये घेतले. कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अग्रवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
