
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या याचिकेद्वारे त्यांच्यावर हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचाराला खतपाणी घालण्यासह द्वेष पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. या याचिकेमुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची
.
गत काही महिन्यांपासून महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज व उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध केल्यानंतर सरकारने यासंबंधीचा जीआर रद्दबातल केला. पण त्यानंतरही ठाकरे व सत्ताधारी भाजपच्या नेत्यांमध्ये या प्रकरणी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज यांनी शुक्रवारी यासंबंधी मीरा भाईंदर येथे एक सभा घेतली होती. त्यात त्यांनी अमराठी नागरिकांना मुंबईत शांततेत व्यापार व्यवसाय करण्याचा इशारा दिला होता. मराठी व्यापारी नाहीत का? महाराष्ट्रात राहायचे असेल त मराठी शिका, नीट व्यापार करा. मस्ती दाखवली, तर दणका बसणार म्हणजे बसणार, असे ते म्हणाले होते.
सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
त्यांच्या या इशाऱ्यानंतर हिंदी भाषिक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असताना आता थेट सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाद्वारे हिंदी भाषिक लोकांविरोधात हिंसाचार भडकवण्याचा व द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. यामुळे महाराष्ट्रात भाषेच्या मुद्यावरून तणाव वाढवल्याप्रकरणी राज यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे लोकांना रस्त्यावर येण्याची प्रेरणा मिळते आणि त्यानंतर हिंदीला विरोध म्हणून मराठी न बोलणाऱ्या किंवा इतर राज्यांमधून आलेल्या लोकंवर मराठी लादण्यात येते, असा आरोपही या याचिकेत करण्यात आल्याचा दावा आयएएनएसने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
पोलिस महासंचालकांकडे तक्रार
उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांच्याविरोधात 3 वकिलांनी नुकतीच पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत राज यांची काही विधाने सामाजिक अशांततेला प्रोत्साहन देणारी तथा सामाजिक सलोखा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारी असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती.
काल मीरा भाईंदरमध्ये झाली राज ठाकरेंची सभा
राज ठाकरे यांची शुक्रवारी मीरा भाईंदर येथे सभा झाली. त्यात त्यांनी मराठीच्या मुद्यावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा दुबे नावाचा एक कोणता तरी खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारू. त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनलवाल्यांनी त्यांचे चालवले का? त्याचे वक्तव्य दाखवले का? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आ म्हाला पटक पटक के मारणार? मी दुबेला सांगतो. तुम मुंबई आ जाओ. मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे, असे राज ठाकरे म्हणाले होते.
हे ही वाचा…
मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली:भाजप आमदार निशिकांत दुबे यांचा खोचक टोला; राज व उद्धव ठाकरे मोठे नेते नसल्याचा दावा
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. दुबे तुम मुंबई में आ जाओ… मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेवर आता दुबे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. मी अखेर राज ठाकरे यांना हिंदी शिकवलीच असे ते म्हणालेत. त्यांच्या या एका वाक्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, यामुळे मराठी विरुद्ध अमराठी वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत. वाचा सविस्तर