
महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाच्या दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधात भेसळ असल्याचा आरोप करत थेट प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. शेतकरी दुधात भेसळ करत नाही,
.
विधानभवनाच्या परिसरात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे विधानभवन परिसरात एक मिक्सर, दूध आणि पाण्याच्या बॉटल, चुना, काही वेगवेगळे केमिकल घेऊन आले. त्यांनी यावेळी हे सर्व मिक्स करुन दुधात कशा पद्धतीने दोन प्रकारे भेसळ केली जाते, याबद्दलची माहिती देत थेट प्रात्यक्षिकच दाखवले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, मुंबई, पुणे यांसारख्या ठिकाणी सर्रास दुधात भेसळ केली जाते. शेतकऱ्यांना दुधाला दर मिळाला पाहिजे, म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. यामुळे लोक मरायला लागली आहे. पुण्यात, मुंबई, नागपुरात राहणारी लोक दिवसभर कष्ट करतात, मेहनत करतात. अनेक लहान मुलांना हे दूध पाजले जाते. सध्या कॅन्सर वाढण्यामागे किंवा रोग वाढण्यामागे कारण काय? तर हे सर्व केमिकल यासाठी जबाबदार आहेत. आमची सरकारला एकच विनंती आहे की तात्काळ त्यांनी या विषयावर काहीतरी निर्णय घ्यावा. यामुळे शेतकऱ्याला दर मिळत नाही आणि इकडे कष्ट करुन दूध खरेदी करणाऱ्याला चांगल्या प्रतीचे दूध मिळत नाही.
जन्मठेपेपर्यंतची कडक शिक्षा झाली पाहिजे – सदभाऊ खोत
सदभाऊ खोत म्हणाले, राज्यात म्हशीचे दूध 80 ते 90 लाख लीटर तयार होते आणि गायीचे दूध 1 कोटी 25 लाख लीटरपर्यंत तयार होते. यातील 70 लाख दूध हे पॅकिंग केले जाते आणि उर्वरित दूध इतर गोष्टींसाठी वापरले जाते. सध्या मोठ्या प्रमाणात भेसळीचे दूध स्वस्त दरात विक्रेत्यांकडे येते. यावर त्यांना कमिशन मिळते. एकीकडे शेतकऱ्याला लुटायचे दुसरीकडे ग्राहकांनाही लुटायचे आणि आमच्या आरोग्याशी खेळायचे असे दूध माफियांचे चालले आहे. अशा लोकांना जन्मठेपेपर्यंतची कडक शिक्षा झाली पाहिजे. तरच दूध शेतकरी, सामान्य नागरिक आणि लहान लेकरांचे आरोग्य वाचेल. 100 टक्के भेसळीच्या दुधाचा कायदा कडक केला पाहिजे. फूड ट्रकची तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. कारण आम्ही शेतकऱ्याची पोर आहोत.