

गत रविवारी नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर एक व्यक्ती आपल्या पत्नीचा दुचाकीला बांधून मृतदेह नेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या महिलेचा एका ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता एक नवी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, पोलिसांनी
.
यासंबंधीच्या माहितीनुसार, गत रविवारी नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने दुचाकीला धडक देऊन पळ काढला होता. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या पतीने रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांकडे मदत मागितली. पण कुणीही त्याची मदत केली नाही. अखेर निराश होत त्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा मृतदेह बाईकच्या मागे बांधला आणि तो तसाच मध्य प्रदेशातील आपल्या गावी गेला. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर हळहळ व्यक्त केली. आता पोलिसांनी एआयच्या मदतीने या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या ट्रकमुळे हा अपघात झाला, त्याला बेड्या ठोकण्यात आले आहे. पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याची ओळख पटवली. यासाठी त्यांना केवळ 15 मिनिटे लागली. हिट अँड रन प्रकरणातील राज्यातील हे पहिले डिटेक्शन आहे. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तब्बल 700 किलोमीटर अंतरावर जाऊन त्याला अटक केली. सत्यपाल राजेंद्र असे आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. त्याला उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील महोई येथून ताब्यात घेण्यात आले.
नेमकी काय घडली होती घटना?
गत 9 ऑगस्ट रोजी अमित यादव हे आपली पत्नी ग्यारसीसोबत नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या गावी जात होते. रस्त्यात एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ग्यारगी ट्रकच्या चाकाखाली सापडली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. त्यानंतर अमित यादव यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक लोकांकडे मदतीची याचना केली. पण त्यांना कुणीही मदत केली नाही. त्यामुळे अमित यांनी आपल्या बायकोचा मृतदेह दुचाकीच्या मागे बांधला. आणि त्याच स्थितीत तो आपल्या गावी गेला.
या घटनेचा एक व्याकुळ करणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर देवलापार पोलिसांपुढे धडक देऊन पळून गेलेल्या ट्रक चालकाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते. सुरूवातीला या ट्रक चालकाचा कोणताही सुगावा लागला नाही. पण त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र ॲडव्हान्स्ड रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर एन्हांस्ड लॉ एन्फोर्समेंट (AI-MARVEL) प्रणालीच्या मदतीने या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. त्यात त्यांना आरोपी ट्रकच चालकाची ओळख पटवण्यात यश आले. पोलिसांनी 16 ऑगस्ट रोजी ट्रक जप्त केला आणि आरोपीला अटक केली. ही माहिती आता समोर आली आहे.