
हिंगोली जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना लवकरच पदोन्नतीची भेट मिळणार असून त्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली गतिमान करण्यात आले आहेत. या संदर्भात नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी ज्येष्ठता यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
.
हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये मागील काही दिवसांपासून पदोन्नतीची कामे रखडली होती. पदोन्नती बाबत कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र पदोन्नती बाबत कुठल्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नव्हत्या. त्यामुळे पदोन्नती मिळणार की नाही असा प्रश्न पात्र कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जाऊ लागला होता.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढण्यासंदर्भामध्ये आवश्यक त्या सूचना विभाग प्रमुखांना दिल्या होत्या. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी मंगळवारी ता. 29 जिल्हा परिषद अंतर्गत कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासनाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पदोन्नतीसाठी रिक्त असलेल्या जागांचा आढावाही घेतला. जिल्हा परिषद अंतर्गत किती कर्मचाऱ्यांना पदोन्नती देता येईल याची सविस्तर माहिती ही त्यांनी घेतली. पदोन्नतीमध्ये प्रामुख्याने सहाय्यक प्रशासनाधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदी प्रमुख पदांचा यांचा समावेश आहे.
त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत पदोन्नतीसाठी कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यासोबतच रिक्त असलेल्या जागा व पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याची सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची भेट मिळणार असल्याचे चित्र आहे.
निवड श्रेणीचा लाभ ही मिळणार
जिल्हा परिषद अंतर्गत निवड श्रेणीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना निवड श्रेणीचा लाभ ही दिला जाणार आहे या कर्मचाऱ्यांचे प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.