
साकोली येथील श्याम हॉस्पिटलमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोनोग्राफीच्या बहाण्याने अश्लील वर्तन केल्याच्या प्रकरणात १९ दिवसांपासून फरार असलेला आरोपी डॉ. देवेश अग्रवाल याने अखेर सोमवार, २८ जुलै रोजी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले. या
.
या प्रकरणात आरोपीला मदत करीत असल्याच्या कारणावरून भाऊ डॉ.भरत अग्रवाल आणि जितेश अग्रवाल यांनादेखील सहआरोपी करण्यात आले होते. तेव्हापासून ते सुद्धा फरार झालेले होते. आरोपीला पकडण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांचे ७ पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने बालाघाट, गोंदिया, अमरावती, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि नागपूर जिल्हा पालथा घातला होता. इतर राज्यांच्या पोलिस ठाणे यांना सूचना व वायरलेसवरून संदेश देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर आरोपीला पकडण्यासाठी सर्व पोलिस यंत्रणेला लूक आऊट नोटीस जारी करण्यात आले होते.
यादरम्यान आरोपीला ताबडतोब अटक करावी यासाठी विविध सामजिक व राजकिय संघटनांनी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा दिले होते. आरोपीला अटक करण्यासाठी उशीर होत असल्याने भंडारा येथेही निवेदने दिले होते. आरोपीला कुणीही मदत करू नये याकरिता २४ जुलै रोजी अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे आणि स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी साकोली पोलिस स्टेशन येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोपीविषयी कोणाला काही माहिती असल्यास पोलिस विभागाला सांगावे. माहिती सांगणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले होते. तसेच आरोपीला जो कोणी मदत करेल त्याच्यावर कारवाईचा कठोर बडगा उगारला जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला होता.
नेमके प्रकरण काय?
साकोली शहरातील श्याम हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीच्या नावाखाली १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी डॉक्टरने अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना ९ जुलै रोजी उघडकिस आली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलगी तिच्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती. डॉ. देवेश अग्रवाल याने सोनोग्राफी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून आई आणि परीचारीकेला सोनोग्राफी रूम बाहेर थांबण्यास सांगितले होते. त्यानंतर अर्धा तास एकटे असलेल्या पीडित मुलीसोबत डॉक्टरने अश्लील वर्तन केले होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला व घरी परतल्यानंतर वडिलांना सांगितला. डॉक्टरने आपला हात धरून मोबाईल नंबर मागितला आणि कोणालाही काही न सांगण्याची धमकी दिली होती. यापूर्वी डॉक्टरने इंस्टाग्राम वरून पीडीतेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी
याप्रकरणी साकोली पोलिसांनी आरोपी डॉ.देवेश अग्रवाल विरोधात अपराध क्रमांक ४०१/२५ कलम ६४(२), (आय)६५(१) भारतीय न्याय संहिता २०२३ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ सह कलम ४, ६,८ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ च्या कलम ३ (२)अन्वये गुन्हा दाखल केलेला होता.अखेर फरार डॉक्टरने भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात सरेंडर केले आहे. मंगळवारी २९ जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद चव्हाण, साकोलीचे पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूले यांनी विशेष शोध मोहीम राबवली होती.