
राज्यभरात शुक्रवारी ठिकठिकाणी मुसळधार ते रिमझिम पावसाने दमदार हजेरी लावली. गत काही आठवड्यांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने श्रावणाच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच कृपा दाखवल्याने मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्हे खऱ्या अर्थाने सुखावले. त्याचवेळी मुंबई, ठाण
.
मराठवाडा, विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रात शुक्रवारी सकाळपासूनच पाऊस बरसला. दुबार पेरणीचे संकटही टळल्याने या ठिकाणच्या विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस म्हणजे वरुणदेवाची कृपा ठरेल, अशी आशा या पावसामुळे उंचावली आहे. छत्रपती संभाजीनगरात दिवसभर संततधार सुरूच होती. जालना, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्गला पावसाने झोडपून काढले. याठिकाणी हवामान विभागाने आदल्या दिवशीच पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. नवी मुंबई व ठाण्यातही पावसामुळे अशीच परिस्थिती होती. पुणे, पिंपरी चिंचवड, रायगड रत्नागिरीतही मुसळधार पाऊस पडत आहे. दुसरीकडे, विदर्भात नागपूर, गडचिरोलीसह जवळपास सर्वच जिल्ह्यातमध्ये जोरदार पाऊस झाला. तर अहिल्यानगरात त्या मानाने पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र होते. येथे तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस वगळता कुठेही पावसाची उल्लेखनीय हजेरी नव्हती. अकोल्यात १५ दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसाचे श्रावण महिन्याच्या पहिल्याच शुक्रवारी सकाळी आगमन झाले. मात्र, कधी मध्यम स्वरुपाचा तर कधी पावसाची संततधार पडत हाेती. अद्यापही महानगरात पावसाची प्रतीक्षाच आहे.खंडाळा घाटात दरड कोसळली : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील एक्सप्रेस वे जवळच्या डोंगरावरील दरड मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कोसळली. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.
कुठे किती पाऊस
मुंबई 74.5 मिमी
नागपूर 26 मिमी
संभाजीनगर 15.9 मिमी
नाशिक 14 मिमी
जळगाव 6.4 मिमी
सोलापूर 4 मिमी
अहिल्यानगर 0.7 मिमी
गडचिरोली 55.7 मिमी
भंडारा 35.2 मिमी
वाशिम 10.4 मिमी
वर्धा 8.9 मिमी
यवतमाळ 7.6 मिमी
अकोला 4.7 मिमी
अमरावती 3.0 मिमी
इशारा : मुंबईकरांनो शक्यतो घरातच थांबा मुंबईकरांनी घराबाहेर पडणे टाळावे, असा इशारा पोलिसांनी दिला. समुद्रात तीन दिवस ४.३७ मीटर उंच लाटांची शक्यता आहे. नागरिकांना समुद्राजवळ जाण्यापासून रोखले आहे.
वाहतूक : खोळंबा, लोकलही मंदावली
तुंबलेले पाणी, वाहतुकीचा खोळंबा यामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली होती. लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशीरा धावल्या. विमान सेवेवरही परिणाम.
अनुकूल स्थितीमुळे पावसाची कृपादृष्टी
अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभरात पाऊस. मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसाची अनेक आठवड्यानंतर कृपा.
आतापर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमीच
राज्यात मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यापासून म्हणजेच जूनपासून आतापर्यंत एकुण ४३१.७ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ९१ टक्के आहे. छत्रपती संभाजीनगरातील २१९.८ मिमी.
पाच दिवस पावसाचेच
मुंबई व कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र व विदर्भासाठी रेड अलर्ट तर मराठवाड्यासाठी आॅरेंज अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट.