सर्व विभागांनी कालमर्यादेत कार्यवाही पूर्ण करावी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले
100 दिवसांच्या आराखड्यानुसार नांदेड जिल्हा अव्वल राहील यादृष्टीने कामे पूर्ण करावेत
नांदेड- राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व कार्यालयात आराखड्यानुसार सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला व प्रत्येक विभागाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत दिलेल्या उद्दिष्टांनुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजुषा कापसे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव तसेच विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
या बैठकीत राज्य शासनाने प्रत्येक कार्यालयाला दिलेल्या 100 कृती आराखड्यानुसार दिलेल्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांनी आतापर्यत केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच शासनाने दिलेल्या कृती आराखड्यानुसार नांदेड जिल्हा राज्यात अव्वल राहील यादृष्टीने प्रत्येक विभागाने आपले काम विहित वेळेत पूर्ण करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या.
100 दिवसांच्या आराखड्यानुसार संकेतस्थळ व माहिती अद्ययावतकरण यामध्ये सर्व कार्यालयांनी त्यांच्या संकेतस्थळावर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आवश्यक माहितीचे स्वयंप्रकटीकरण करावे. संकेतस्थळ नागरिकांसाठी उपयुक्त, सुलभ आणि माहितीपूर्ण असावे.
नागरिकांना सेवा सुलभ करणे
नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कमीत कमी दोन सेवा सुलभ करण्याच्या दृष्टीने नव्या कार्यपद्धती राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. स्वच्छता व अभिलेख व्यवस्थापन यामध्ये कार्यालयातील स्वच्छता कायम राखण्यावर भर देत, निंदनीय व नष्ट करण्यायोग्य अभिलेखांचे वर्गीकरण आणि प्रक्रिया तात्काळ राबवण्याचे आदेश दिले.
तक्रारींचे जलद निराकरण यामध्ये “आपले सरकार”, “पीजी पोर्टल” आदी माध्यमांतून प्राप्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारींचा पूर्ण निपटारा करावा. तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी उपाय यात नागरिकांसाठी कार्यालयात दर्शनी भागात अभ्यागत भेटीच्या वेळेची माहिती फलकावर असावी.
ग्रामस्तरावरील कामकाजावर लक्ष याबाबीत अधिकारी वर्गाने आठवड्यातून किमान एकदा क्षेत्रीय कार्यालयांना भेट देवून ग्रामपंचायती, आरोग्य केंद्र, शाळा व अंगणवाड्यांच्या कामकाजाची पाहणी करावी. 100 दिवसांचा कृती आराखडा म्हणजे केवळ औपचारिकता न राहता, त्यातून नागरिकांना फायदा होईल याची प्रत्येक विभागाने काळजी घ्यावी. प्रशासन हे नागरिकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम असावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर याबाबतचे पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले.
Leave a Reply