नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागात कसुरी अहवाल पाठविल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याची अथवा अंमलदाराची बदली कार्यकारी शाखा सोडून करण्यात येत असते असा अलिखीत नियम आहे. परंतू नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी कसुरी अहवालानंतर पोलीस अंमलदाराची बदली नांदेड शहरात नगरसेठ मानल्या जाणाऱ्या पोलीस ठाण्यात करुन त्यांच्या प्रशंसेसाठी त्यांचा सन्मान केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 ते 3 महिन्यापुर्वी हदगाव येथून बदलून आलेल्या एका पोलीस अंमलदाराची बदली पोलीस अधिक्षकांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात केली आहे. नांदेड जिल्ह्यात वजिराबाद पोलीस ठाणे हे नांदेड जिल्ह्याचे हृदय मानले जाते. कारण या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हद्द कमी असली तरी एवढे काम आहे की, पोलीस अधिकारी पोलीस अंमलदारांना भोजन करायला वेळ मिळत नाही.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन ते तीन महिन्यापुर्वी आलेले पोलीस अंमलदार बालाजी व्यंकटी सातपुते बकल नंबर 900 यांची बदली 22 मार्च 2025 रोजी करण्यात आली. या अगोदर ते हदगाव पोलीस ठाण्यातील निवघा पोलीस चौकीचे प्रभारी होते. त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यवाहीमुळे हदगाव पोलीस निरिक्षकांनी त्यांची बदली सन 2024 च्या सार्वजनिक बदल्यांमध्ये झाल्यानंतर सुध्दा त्यांना कार्यमुक्त केले नव्हते. डिसेंबर-जानेवारीमध्ये नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी 2024 च्या बदली झालेल्या सर्व अधिकारी आणि अंमलदारांना सोडण्याच्या सुचना केल्यानंतर ते नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आले.(आजही सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार या ंची बदली झाल्यानंतर सुध्दा त्यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही. याच्या मागची कारणे अत्यंत सुंदर आहेत.) नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे ते वजिराबाद या बदलीमागे त्यांच्यात असलेली प्रगल्भता, त्यांची उच्च कोटीची कार्यशैली लक्षात घेतली असेल असे वरवर दिसते. पण या मागे खुप मोठा आरोप आहे. वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांनी 4 मार्च 2025 रोजी पोलीस अंमलदार बालाजी सातपुते विरुध्द पोलीस महानिरिक्षक नांदेड पोलीस परिक्षेत्र यांच्याकडे एक तक्रार केली. त्या तक्रारीनुसार पोलीस अंमलदार बालाजी सातपुते यांचे एक बंधु आहेत. त्यांचे नाव केशव व्यंकटी सातपुते आहेत. ते विष्णुपूरी येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन करतात त्यासाठी तराफे आणि इंजिन वापरले जाते. रेती भरण्यासाठी जेसीबी पण विकत घेतलेली आहे. भारत बेंज या हायवा कंपनीच्या गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यांचे पासींग क्रमांक एम.एच.14 डी.एम.4675 आहेत. सोबतच दोन टिपर आहेत. ज्यांचे क्रमांक एम.एच.27 एक्स 1720 आणि एम.एच.12 डी.टी.6340 त्यांच्याकडे आहे. चोरटी वाळू वाहतुक करून केशव व्यंकटी सातपुते माझा भाऊ पोलीस आहे. माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही, माझ्या गाड्या कोणीच पकडत नाहीत या तोऱ्यात वागत असतात. त्यांच्याविरुध्द अवैध वाळू वाहतुकीविरुध्द दंडात्मक कार्यवाहीची नोंद पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणमध्ये आहे.
1 जानेवारी 2025 या नववर्ष दिनी अवैध वाळूची वाहतुक करणाऱ्या केशव सातपुते यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिली. त्यातील चालक प्रथमेश धीरज जोशी हा सध्या गंभीर जखमी आहे. तो मृत्यूशी झुंज देत आहे. त्या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 106/2025 दाखल आहे. अपघात करणारी अवैध वाळू वाहतुक हायवा गाडी सध्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जप्त आहे.
अवैध वाळू व्यवसायातून मिळवलेल्या पैशातून सातपुते बंधूंनी एसआरटीएमयु समोर वेद बार ही करोडो रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. तेथे एक लॉजपण आहे. या लॉजमध्ये अवैध व्यवसाय चालतात अशी माहिती सुध्दा आहे. त्यामुळे स्वग्राम असतांना बालाजी सातपुतेने आपली बदली भावाच्या अवैध व्यवसायाला मदत करण्यासाठीच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात करून घेतली आहे. त्याबाबत चौकशी करून योग्य कार्यवाही करावी नसता वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे वंचित स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात लिहिलेले आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा आणि पोलीस निरिक्षक नांदेड ग्रामीण यांना सुध्दा देण्यात आल्या आहेत.
त्यानंतर बालाजी व्यंकटी सातपुते विरुध्द आलेल्या कसुरी अहवालातून 22 मार्च रोजी अत्यंत नामांकित पोलीस अंमलदार बालाजी व्यंकटी सातपुते बकल नंबर 900 यांच्या बदलीचे आदेश नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांना लगेच कार्यमुक्त करण्यात आले आणि ते लगेच वजिराबाद पोलीस ठाण्यात हजर पण झाले. आता बालाजी सातपुते यांची ज्या प्रशंसेमुळे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातून वजिराबाद पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच पोलीस दलाचे नाव उज्वल होईल हे मात्र नक्कीच.
Post Views: 108
Leave a Reply