लातूर जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सीन लसीचे ४३८०५ डोस उपलब्ध
लातूर : १ एप्रिलपर्यंत लातूर जिल्ह्यासाठी फक्त कोविशिल्ड लस उपलब्ध झाली होती. आता कोव्हॅक्सीन लस उपलब्ध झाली आहे. या लसीचे ४३ हजार ८०५ डोस जिल्ह्याला मिळाले आहेत. जिल्ह्यातील १०० लसीकरण केंद्रांवर मागणीनूसार लसीचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली. ४५ वर्षांपुढील नागरिकांना १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यास प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी २ हजार ३२३ जणांना लस देण्यात आली.
सरकारी व खाजगी अशा एकुण १०० लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. महानगगरपालिकेच्या वतीने नागरी दवाखान्यामध्ये लस देण्याची सोय करण्यात आली आहे. ६० वर्षांपूढील ४९ हजार ३६४ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर इतर सहव्याधी असलेल्या ४५ वर्र्षांच्या पुढील ९ हजार ६८३ व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. तर २५ हजार ७३४ आरोग्य कर्मचा-यांनीही कोरोना लस घेतली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रातही लस देण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
प्रारंभी सरकारी व खाजगी आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचा-यांना लस देण्यात आली. ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेले आणि ६० वर्षे वयाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना १६ जानेवारीपासून लस देण्यास प्रारंभ झाला आहे. आता ४५ वर्षापुढील सर्वांनाच लस दिली जात आहे, असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख म्हणाले.