2 लाखाच्या वीज बिलाची भीती दाखवून 20 हजाराची लाच स्वीकारणारे एमएसईबी चे दोन गजाआड
नविन नांदेड,(प्रतिनिधी)- लोकांना कायद्याचा बडगा दाखवून आम्ही दुधाने आंघोळ केलेले आहोत असे दाखवणारे महावितरण कंपनी मधील दोन जण 20 हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहेत.
सिडको भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने 26 नोव्हेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांच्या घरात एकूण तीन विद्युत मीटर होते.त्यांनी आपल्या घरात सोलार कलेक्शन बसवल्यानंतर त्यातील दोन मीटर एमएसईबी च्या कर्मचाऱ्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी काढून नेले. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी एमएसईबी विभागाचे विद्युत सहाय्यक केंद्र आले आणि तुमच्या मीटरवर वाढीव बिल आहे असे सांगितले. त्याचे जवळपास दोन लाख रुपये बिल येणार आहे हेही सांगितले. त्याबद्दल तुम्ही आमच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना येऊन बोला असेही सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार एमआयडीसी शाखा सिडको येथे जाऊन वीज वितरण कंपनीतील लेखा विभागातील लेखापाल श्रीमंगले यांना भेटले त्यांनी कॉम्प्युटर लाईट बिल संदर्भात रीडिंग दाखवून तुम्हाला दोन लाख रुपये बिल येईल अशी भीती दाखवली त्यावेळी तक्रारदाराकडून पाच हजार रुपये घेतले आणि तुमचे बिल शून्य करायचे असेल तर वीस हजार रुपये आणखी द्यावे लागतील असे सांगितले.
दिनांक 26 ऑक्टोबर रोजी तक्रारदाराकडे सोलार कनेक्शन बसवणारे ओमकार पवार आले आणि सांगितले की तुमच्या मीटरचे बिल संदर्भात तुम्हाला एमएसईबी ऑफिस सिडको येथे श्रीमंगले यांनी बोलावले आहे. मला हा निरोप देण्यासाठी विद्युत सहाय्यक केंद्रे यांनी सांगितले आहे. त्यानुसार तक्रारदार तेथे गेले आणि श्रीमंगले यांनी त्यांना वीस हजार रुपयाची लाच मागितली त्यानंतर तक्रारदाराने तक्रार दिली. दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी लाच मागणीची पडताळणी झाली त्यात सोनाजी मंगले याने आधी पाच हजार रुपये दिले आहेत, आता राहिलेले 20000 रुपये द्या अशी लाचेची मागणी केली. लाच स्वीकारण्याचे मान्य केले त्यानंतर तक्रारदाराने लाचेची रक्कम घेऊन विद्युत केंद्र आले तेव्हा श्रीमंगलेने विद्युत सहाय्यक केंद्रे यांच्याकडे द्या असे सांगितले.विद्युत सहाय्यक केंद्र यांनी लाचेची रक्कम पवार यांच्याकडे असे सांगितले. तेव्हा तक्रारदाराने श्रीमंगले यांनी तुमच्याकडे त्यांना सांगितले आहेत असे म्हटल्याने केंद्रे यांनी श्रीमंगलेला फोन लावून तक्रारदाराकडे मोबाईल दिला. तेव्हा तक्रारदाऱ्याने मोबाईलवर श्रीमंगले यांना कुठे आहेत असे विचारले असता मी पाठीमागे आहे असे म्हणून तक्रारदार यांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून लाचेची 20 हजार रुपये रक्कम स्वीकारताना प्रतिबंधक विभागाने त्यांना आणि केंद्रेला ताब्यात घेतले.या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गजानन कोंडीबा केंद्रे विद्युत सहाय्यक आणि सोनाजी मोतीराम श्रीमंगले सहाय्यक लेखापाल 33 केव्ही उपकेंद्र एमआयडीसी शाखा सिडको या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. संजय तुंगार, पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रीती जाधव, पोलीस अंमलदार गजेंद्र मांजरमकर, संतोष बच्चेवार,यशवंत दाभणवाड आदींनी ही कार्यवाही केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणताही लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी इसम, व्यक्ती, एजंट कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा दूरध्वनी क्रमांक 2462-253512 आणि टोल फ्री क्रमांक 1064.