भर उन्हात तपासणीसाठी रांगा | कोविडच्या चाचणीत महापालिकेचा भोंगळ कारभार
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेने शहराच्या विविध भागात कोविड चाचणीची सुविधा केली खरी परंतु या केंद्रावर भोंगळ कारभार सुरु असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. काहीनी याबाबत आलेले अनुभव सकाळकडे कथन केले.
महानगरपालिकेने शहरात कोवीडची व्यापक तपासणी वाढावी यासाठी जवळपास पंधरा ठिकाणी सुविधा केंद्र सुरु केले आहेत. महापालिका रुग्णालय सांगवी, मनपा रुग्णालय तरोडा, मनपा रुग्णालय जंगमवाडी, मनपा रुग्णालय पौर्णिमानगर, शिवाजीनगर मात्र सेवा केंद्र, मनपा रुग्णालय विनायकनगर, मनपा रुग्णालय नवीन इमारत, मनपा रुग्णालय विनायकनगर गंगानगर सोसायटी, मनपा रुग्णालय श्रावस्तीनगर, मनपा रुग्णालय खडकपुरा, मनपा शाळा वजीराबाद, मनपा रुग्णालय हैदरबाग, मनपा रुग्णालय करबला जुने नांदेड, मनपा रुग्णालय अरबगल्ली जुने नांदेड, मनपा रुग्णालय कवठा, मनपा रुग्णालय सिडको येथे कोविड चाचणी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
त्या त्या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा आहे. असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गलथान कारभाराला सामोरे जावे लागले. सर्वात प्रथम कोरोनाची लक्षणे असलेले संबंधीत संशयित रुग्ण आणि लक्षणे नसणाऱ्यांना एकाच रांगेत उभे राहावे लागत आहे. त्या वेळी वेगळ्या रांगा कराव्यात, थर्मल स्कॅनिंग करून वेगळी रांग करावी, त्या केंद्रावर पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी असावेत, एकच व्यक्ती सर्वांचे स्वॅब घेत आहे आणि टेस्ट करीत आहेत. ते पण कुठल्याही परिस्थितीत पीपीई कीटशिवाय. मनपाने एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या विभागात तपासणी केंद्र सुरू केले. त्या केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी तपासणीसाठी आलेल्या व्यक्तींना तुम्ही तुमच्या आधार कार्डवर असलेल्या त्यानुसार त्याच केंद्रावर जाऊन तपासणी करा आम्ही तुमची तपासणी करणार नाही असे सांगत आहेत.
सकाळी आठ ते नऊ वाजता रांगेत उभे राहणाऱ्या व्यक्तीला अकरा वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागत आहे. कोरोना बाधित रुग्णांना रविवार पर्यंत तरी कुठलीही मार्गदर्शन किंवा सूचना देण्यात आल्या नव्हत्या. काही जणांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. ज्यात वयस्कर व्यक्ती देखील पहावयास मिळत आहेत. तपासणी अहवालाचा मेसेज मोबाईलवर येईल असे सांगण्यात येते. परंतु काही वेळा वास्तविकता अशी आहे की यादी जाहीर करून तेथे भिंतीवर लावण्यात येत आहे तेथे गर्दी असून घातक ठरु शकते हे टाळायला हवे. तपासणी अहवाल यायला उशीर लागतो. वेळेत येत नाहीत आणि फोन करुन विचारलं तर आम्हाला माहित नाही असे सांगण्यात येते. या सर्व प्रकाराची मनपा व जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कोई रुग्ण संख्या वाढ आणि त्यांच्या सुविधेबाबत उपाय योजावेत अशा सूचना नांदेड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (उत्तर) दत्ता पाटील कोकाटे यांनी केल्या आहेत.