Rajya Sabha Selection Insider Story; BJP Ministerial Word
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर भुजबळ कुटुंब नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. मात्र, आता या संपूर्ण घडाम
.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची जागा आपल्याला मिळावी आणि पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिली जावी, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली होती. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हा प्रस्ताव नाकारल्याने अखेर राष्ट्रवादीने प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि त्यांची बिनविरोध निवडही झाली. आपल्याला आणि कुटुंबियांना संधी न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी, “जो न्याय इतर नेत्यांच्या मुला-बाळांना लागू होतो, तोच मलाही मिळायला हवा,” अशा शब्दांत आपली नाराजी उघड केली होती. या सर्व राजकीय घडामोडींवर आता खुद्द समीर भुजबळ यांनी मौन सोडले असून या प्रकरणातील ‘इनसाईड स्टोरी’ सांगत एक मोठा खुलासा केला आहे.
शपथविधी का टळला? समीर भुजबळांनी सांगितले कारण
राज्यसभा आणि मंत्रिपदाच्या चर्चांबाबत बोलताना समीर भुजबळ म्हणाले, “माझ्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि महायुतीच्या नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र, त्यावेळी मंत्रिपदाच्या शपथेसाठी वेळ अतिशय कमी उपलब्ध होता, त्यामुळे तो शपथविधी पार पडू शकला नाही. परंतु, ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल होईल, त्यावेळी मला नक्कीच संधी दिली जाईल, असा शब्द केंद्रीय भाजप नेतृत्वाकडून आणि महायुतीकडून मला देण्यात आला आहे”
२५ वर्षे पक्षासाठी सतरंज्या उचलल्या, संधी मिळायलाच हवी
आपल्या राजकीय प्रवासाचा दाखला देत समीर भुजबळ पुढे म्हणाले, “माझा कधीच राज्यसभेवर जाण्याचा विचार नव्हता. छगन भुजबळ यांची संसदेत जाण्याची इच्छा होती. मी लहानपणापासून राजकारणात आहे, आधी शिवसैनिक म्हणून काम केले आणि १९९९ सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहे. पक्षाचा झेंडा बनवण्यापासून, चिन्ह ठरवणे, षण्मुखानंद हॉल आणि शिवाजी पार्कवरील सभांचे नियोजन करण्यापर्यंत पक्षाची सर्व पडद्यामागील कामे मी केली आहेत. २५ वर्षांपेक्षा जास्त काळ पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे मला संधी मिळण्यात कोणतीच अडचण नाही.”
समीर भुजबळ यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे भुजबळ कुटुंब तूर्तास नरमाईच्या भूमिकेत असल्याचे दिसत असले, तरी आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना दिलेला शब्द पाळला जातो की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
छगन भुजबळांचा आग्रह आणि पक्षांतर्गत राजकारण
नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, तर विधान परिषद निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना संधी दिली. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी, “जो न्याय इतर नेत्यांच्या मुला-बाळांना लागू होतो, तोच न्याय माझ्या कुटुंबालाही मिळायला हवा,” अशी भूमिका घेतली होती. ते समीर भुजबळांना मंत्रिपद किंवा राज्यसभेवर संधी मिळावी यासाठी आग्रही होते, मात्र हा प्रस्ताव सध्यातरी ‘वेटिंग’वर पडल्याचे दिसून येत आहे.
