शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराला मित्रपक्षाचाच दणका!:संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, नेमके प्रकरण काय?

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-06-09t170932395_1781005184.jpg




आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपच्याच एका नेत्याने त्यांना तब्बल 100 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्षांनी ही नोटीस पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मित्रपक्षाकडूनच कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला गेल्याने गायकवाड यांची राजकीय आणि कायदेशीर डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच संजय गायकवाड यांनी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशकाला फोनवरून शिवीगाळ केली होती. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि पक्ष नेतृत्वानेही नाराजी व्यक्त करत त्यांना समज दिली होती. याच पार्श्वभूमीवर, वकील असीम सरोदे यांनीही संजय गायकवाड यांच्यावर पॉक्सो, अ‍ॅट्रॉसिटी आणि मानवाधिकार उल्लंघनासारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजप जिल्हाध्यक्षांकडून संजय गायकवाडांना 100 कोटींची नोटीस आमदार संजय गायकवाड यांनी गेल्या 6 आणि 10 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता विजयराज शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत, वकील असीम सरोदे यांच्या मार्फत संजय गायकवाड यांना तब्बल 100 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच, त्यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांबद्दल येत्या पंधरा दिवसांत सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणीही या नोटिशीत करण्यात आली आहे. पॉक्सो, अ‍ॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी या मानहानीच्या दाव्याव्यतिरिक्त, वकील असीम सरोदे यांनी बुलढाण्याच्या पोलिस अधीक्षकांना एक स्वतंत्र पत्र लिहून गायकवाड यांच्या अडचणीत आणखी भर घातली आहे. संजय गायकवाड यांनी आपल्या कृत्यांमधून पॉक्सो, अ‍ॅट्रॉसिटी आणि मानवाधिकार कायद्यांचे गंभीर उल्लंघन केल्याचा दावा करत, त्यांच्यावर या कायद्यांअंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करण्याची विनंती सरोदे यांनी केली आहे. या नव्या कायदेशीर आणि राजकीय पेचप्रसंगामुळे आमदार गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आणि अडचणीत सापडले असून, आता ते या नोटिशीला कायदेशीर उत्तर देतात की जाहीर माफी मागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यापूर्वीही संजय गायकवाड अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कृत्यांमुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात असतात. यापूर्वी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण आणि ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला केलेली शिवीगाळ, ज्यामुळे बुलढाण्यात त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलनेही झाली होती, यांसारख्या घटनांमुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. याशिवाय, जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेत्यांसोबतचा त्यांचा राजकीय संघर्षही सर्वश्रुत असून, याच वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता त्यांना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याने त्यांच्यासमोरील अडचणीत आणखी भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *