स्ट्रेचरअभवी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची वणवण:अकोल्यात संताप; आमदार बच्चू कडूंनी अधिष्ठाताला झापले, कमिशनखोरीचा आरोप

0
new-project-2026-06-09t145528662_1780997205.jpg




महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेच्या असंवेदनशीलतेची आणि भोंगळ कारभाराची चिड आणणारी एक भयावह घटना अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातून नुकतीच समोर आली होती. वेळेवर स्ट्रेचर न मिळाल्यामुळे एका लाचार महिलेला आपल्या आजारी पतीला चक्क पाठीवर घेऊन उपचारासाठी रुग्णालयात धावपळ करावी लागली. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण अकोल्यासह राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी थेट रुग्णालयात धडक देत अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांना झापत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अकोला जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार उघड झाला आहे. एका बाजूला ब्रेन स्ट्रोकमुळे अपंगत्व आलेला आजारी पती पाठीवर घेतलेली महिला, समोर छातीशी लटकवलेली बॅग आणि मागे मागे चालणारी तिची छोटी निरागस मुलगी… ती महिला जीवाच्या आकांताने आपल्या पतीला उपचार मिळावा म्हणून रुग्णालयातील प्रत्येकाकडे मदतीची याचना करत होती. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे याकडे साधे लक्षही नव्हते. एकीकडे ही महिला पतीचे प्राण वाचवण्यासाठी धडपड असताना, रुग्णालयाचा ‘वार्डबॉय’ मात्र कोपऱ्यात उभा राहून आरामात तंबाखू मळण्यात मग्न असल्याचा संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आमदार बच्चू कडूंची रुग्णालयात धडक; अधिकाऱ्याला झापले या अमानुष प्रकारानंतर संतप्त झालेले आमदार बच्चू कडू यांनी अकोला जिल्हा रुग्णालयाला तात्काळ भेट दिली. रुग्णालयातील असुविधा आणि अनागोंदी कारभाराचा जाब विचारताना त्यांनी अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांना सर्वांसमोर चांगलेच झापले. यावेळी बच्चू कडू यांनी रुग्णालय प्रशासनावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे कंत्राट मिळालेल्या भाजप नेते प्रसाद लाड यांच्या कंपनीचे काम सध्या बंद आहे. असे असतानाही रुग्णालयाच्या अधिष्ठातांना त्यांचे ‘कमिशन’ नियमित सुरू आहे. अधिष्ठाता सोनुने हे नागपूरचे असल्यानेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.” व्हिडिओ काढणाऱ्या तरुणीला अटकाव रुग्णालयाची पोलखोल करणारा हा संपूर्ण व्हिडिओ अनुराधा नाठे नावाच्या तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. मात्र, हा अत्यंत संवेदनशील व्हिडिओ शूट करत असताना रुग्णालय प्रशासनाने आपल्याला धमकावून अटकाव करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप अनुराधाने केला आहे. दुसरीकडे, रुग्णालय प्रशासनाने या तरुणीच्या हेतूवरच शंका घेतली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांना या भोंगळ कारभाराबद्दल विचारले असता, त्यांनी आपली चूक मान्य करण्याऐवजी या संपूर्ण प्रकरणाचा संबंध थेट ‘राजकारणाशी’ जोडून स्वतःची कातडी वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. प्रशासनाकडून ३ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासन अॅक्शन मोडवर आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी आज संध्याकाळपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार असेल, असा इशाराही रुग्णालय प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *