आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात कळमनुरीचा झेंडा:डॉ. संतोष कल्याणकर यांच्या सादरीकरणाची जागतिक स्तरावर दखल
![]()
कळमनुरीच्या केंब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर्सचे अध्यक्ष डॉ. संतोष कल्याणकर यांनी नुकताच फिनलंड आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद व जर्मनी येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात सहभाग नोंदवून कळमनुरीच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला आहे. दि. १० मे ते १५ मे दरम्यान हेलसिंकी (फिनलंड) येथे क्रिएटिव्ह कौन्सिल ऑफ एज्युकेशन, फिनलंड यांच्या वतीने आयोजित “पहिली आंतरराष्ट्रीय सृजनशील शिक्षण परिषद” उत्साहात पार पडली. या परिषदेत जगभरातील शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते. यामध्ये डॉ. संतोष कल्याणकर यांनी “शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना” या विषयावर केंब्रिज व डीकेएम शाळेतील अनुभवाधारित संशोधनाचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाची जागतिक स्तरावर विशेष दखल घेण्यात आली. या माध्यमातून डॉ. कल्याणकर यांना फिनलंडची जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली शिक्षण प्रणाली जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. त्यांनी तेथील विविध शाळा, आधुनिक सार्वजनिक ग्रंथालये आणि शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. नागरिकांची स्वयंशिस्त, तंत्रज्ञान आणि निसर्ग यांचा समतोल यामुळे फिनलंड हा जगातील सर्वाधिक आनंदी देश कसा बनला आहे, याचाही त्यांनी अभ्यास केला. यानंतर दि. १६ मे ते २४ मे दरम्यान जर्मनीमध्ये डिडॅक आयोजित “जागतिक नेतृत्व अभ्यास कार्यक्रम” अंतर्गत त्यांनी भारतीय शिक्षणतज्ज्ञांच्या शिष्टमंडळासोबत सहभाग घेतला. देशभरातील विविध राज्यांतील सुमारे ३० शिक्षणतज्ज्ञांसह त्यांनी जर्मन शिक्षण मंत्रालयासोबत आयोजित भारत-जर्मनी बैठकीत सहभाग नोंदविला. या बैठकीत महाराष्ट्र शासन आणि जर्मन सरकार यांच्यात नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारातील विविध तरतुदींवर चर्चा करण्यात आली. या अभ्यास दौऱ्यात त्यांनी जर्मनीतील प्रसिद्ध “ड्यूल शिक्षण पद्धती” तसेच “कौशल्याधारित आणि व्यावसायिक शिक्षण व्यवस्था” यांचा सखोल अभ्यास केला. त्याअंतर्गत चेंबर ऑफ क्राफ्ट्स अँड ट्रेड, सेंटर फॉर स्कूल क्वालिटी अँड टीचर ट्रेनिंग (बाडेन-वुर्टेंबर्ग), व्होकेशनल बिझनेस स्कूल गोपिंगेन, मॅनहाईम विद्यापीठ, लाइबनिझ शाळा, स्टाइनहोवेल शाळा तसेच जगप्रसिद्ध मर्क शिक्षण केंद्र यांसारख्या नामांकित संस्था, विद्यापीठे आणि प्रशिक्षण केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या. याशिवाय मर्सिडीज-बेंझ संग्रहालयाला भेट देत त्यांनी जर्मनीच्या नवोन्मेष, अभियांत्रिकी आणि अनुभवाधारित शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला. फ्रँकफर्ट, स्टुटगार्ट, हायडेलबर्ग आणि डार्मस्टाड्ट येथील विविध शाळा, विद्यापीठे, संशोधन केंद्रे आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये त्यांनी संवाद साधला. शिक्षण क्षेत्रातील जागतीक घडामोडी अतिशय जवळुन अनुभवण्याची संधी मला मिळाली व केवळ केंब्रिज आणि डीकेएम शाळाच नव्हे, तर समाजातील जिथे शक्य आहे तिथे या जागतिक अनुभवांचा उपयोग शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी केला जाईल, असे विचार याप्रसंगी डॉ संतोष कल्याणकर यांनी व्यक्त केले. कळमनुरीसारख्या ग्रामीण भागातील शिक्षणतज्ज्ञाला मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय संधीबद्दल विविध स्तरांतून डॉ. संतोष कल्याणकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
