School Stationery | पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी! शालेय साहित्य ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढलं
School Stationery | नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. वह्या, पुस्तके, गाईड, वर्कबुक आणि शालेय गणवेश यांसह विविध शैक्षणिक साहित्यांच्या किमतींमध्ये यंदा मोठी वाढ झाली आहे. वाढत्या इंधनदरांसोबतच कागदासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या महागाईमुळे शालेय साहित्य तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी महागले असल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्याचा थेट परिणाम देशातील डिझेल आणि पेट्रोलच्या दरांवर झाला आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे बाजारात पोहोचणाऱ्या शालेय साहित्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः कागद निर्मितीसाठी लागणाऱ्या पल्प आणि इतर कच्च्या मालाच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाल्याने वह्यांचे दर गेल्या वर्षाच्या तुलनेत 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत.
जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असल्याने पुणे (Pune) शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. मात्र वाढलेल्या दरांमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदी अपरिहार्य असल्यामुळे अनेक कुटुंबांचे मासिक आर्थिक नियोजन कोलमडत असल्याचे चित्र दिसत आहे.
School Stationery | गणवेश आणि पूरक साहित्यही महागले :
वह्या आणि पाठ्यपुस्तकांबरोबरच पूरक शैक्षणिक साहित्याचे दरही वाढले आहेत. गाईड, वर्कबुक, प्रोजेक्ट साहित्य आणि होमवर्कसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत 20 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे एकूण शालेय खर्च यंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
याशिवाय शालेय गणवेशाच्या किमतींमध्येही 10 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गणवेशासाठी लागणारे कापड महागल्याने तसेच शिवणकाम करणाऱ्या कारागिरांच्या मजुरीत वाढ झाल्याने पालकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत आहे. आधीच महागाईच्या दबावाखाली असलेल्या मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण बनत असल्याची भावना पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
