आमदार संजय गायकवाड यांना जबर झटका:प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी होणार चौकशी, कोर्टाने दिली परवानगी
![]()
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या नावावरून त्याचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना जबर झटका बसला आहे. कोर्टाने त्यांच्या पोलिस चौकशीला परवानगी दिली असून, यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, संजय गायकवाड यांनी आपण मर्डरचा गुन्हा केला नसल्याचे नमूद करत पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. दिवंगत गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिले होते. त्यानंतर आता आमदार संजय गायकवाड यांना या पुस्तकाचे नाव एकेरी शब्दांत असल्याचा साक्षात्कार झाला होता. या प्रकरणी त्यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून धमकावले होते. तसेच त्यांना अर्वाच्य शब्दांत शिवीगाळही केली होती. त्यानंतर आंबी यांनी कोल्हापूर्या राजारामपुरी पोलिस ठाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. पण आता कोर्टाने आमदार गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी दिल्यामुळे या प्रकरणी पुढील कारवाई व गुन्हा दाखल करण्याची वाट मोकळी होऊ शकते. पोलिस गायकवाडांना चौकशीची नोटीस बजावणार दुसरीकडे, आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून अजूनही प्रशांत आंबी यांना धमकावण्याचे फोन सुरू आहेत. गत महिनाभरात त्यांना असे 100 हून अधिक फोन आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी ते पोलिसांतही नव्याने तक्रार दाखल करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कोर्टाच्या परवानगीनंतर आता कदाचित आमदार संजय गायकवाड यांना चौकशीसाठी कोल्हापुरात यावे लागेल. राजाराम पोलिस स्वतःही संजय गायकवाड यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देऊ शकतात किंवा त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात मांडण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार – गायकवाड दुसरीकडे, कोर्टाने चौकशीची परवानगी दिल्यानंतर संजय गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल मी जी काही शिवीगाळ केली होती, त्यावर मी दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढेही शिवरायांचा अपमान करणाऱ्याचा विषय असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात दगलबाज शिवाजी, शिवाजी शिवाजी कोण होता? या पुस्तकांवर बंदी आणण्याकरता मी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही असणार आहे. याविषयी न्यायालयाने जे काही आदेश दिले असतील, पोलिसांना सहकार्य करण्यास मी तयार आहे. मी न्यायालयाचा आदर करून चौकशीला सामोरे जाईन. त्या पुस्तकात 135 वेळा छत्रपतींचा अपमान केला आहे. तो आम्ही सहन करणार नाही. मी काही मर्डरचा गुन्हा केला नाही. मला अद्याप पोलिसांची नोटीस आली नाही. माझे महाराष्ट्र भर समर्थक आहेत. अशा अज्ञात समर्थकांकडून प्रशांत आंबींना धमक्या दिल्या जात असतील, तर मी काही करू शकत नाही. या प्रकरणी माझ्यावर दखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. नेमकी काय घडली होती घटना? आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवराळ भाषेत शिवीगाळ केली होती. तसेच या पुस्तकाची छपाई केल्यास घरी येऊन मारेन अशी धमकीही दिली होती. त्यांच्या या संभाषणाची क्लीप सोसल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर एकच खळबळ माजली होती. या घटनेविरोधात प्रशांत आंबी ठामपणे उभे राहिले होते. त्यांनी संजय गायकवाड यांच्या बुलढाणा स्थित घरापुढे जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. संजय गायकवाड व प्रशांत आंबींत काय झाला होता संवाद? संजय गायकवाड आपल्या फोनमध्ये म्हणाले होते, अरे गोविंद पानसरे हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. त्या गोविंद पानसरेचे काय झाले, त्याची काय अवस्था झाली, हे तुला माहिती आहे ना. मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन. या शिवीगाळीनंतर प्रशांत आंबी हे आमदार गायकवाड यांना समजावण्याच्या सूरात म्हणाले होते, शिवाजी कोण होता हे पुस्तक मी नव्हे तर प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी लिहिले आहे. हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झाले. या पुस्तकाद्वारे शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. तुम्ही अगोदर ते पुस्तक वाचा. त्यानंतरही गायकवाड यांनी आंबी यांना शिवीगाळ सुरूच ठेवली. त्यानंतर आंबी यांनी गायकवाड यांना तुम्ही उद्या माझी जीभ कापायला या असे ठाम प्रत्युत्तर दिले. रोहित पवारांनीही साधला निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. तसेच विकास लवांडे यांच्या प्रकरणात तत्परता दाखवणारे पोलिस प्रशासन प्रशांत आंबी प्रकरणात दिरंगाई का करत आहे, असा सवालही उपस्थित केला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या, कॉ. स्व. गोविंद पानसरे सरांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या, प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लाघ्य शिवीगाळ करणाऱ्या, महिलांचा अवमान करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या चौकशीसाठी अखेर कोल्हापूर न्यायालयाने परवानगी दिली असून, लवकरच ही चौकशी होईल, अशी अपेक्षा! दुसरीकडं विकास लवांडे यांच्या प्रकरणात न्यायालयात खोटी माहिती देऊन तत्परता दाखवणारं पोलीस प्रशासन प्रशांत आंबी प्रकरणात पुरावे असतानाही दिरंगाई करतंय, यावरुन राजकीय दबाव किती आहे हे स्पष्टपणे दिसून येतं. प्रशांत आंबी प्रकरणात उच्च न्यायालयाने देखील याचिका स्वीकारली असून त्या ठिकाणीही लवकरच सुनावणी सुरू होईल. त्यामुळं पोलिसांनी आता तरी चौकशीबाबत दिरंगाई न करता ‘आम्ही जनतेसाठी काम करतो, राजकीय आदेशासाठी नव्हे’, हे दाखवून द्यावं, असे ते म्हणालेत.
गायकवाडांवर दखलपात्र गुन्हा नोंदवा – असीम सरोदे दुसरीकडे, वकील असीम सरोदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, आमदार संजय गायकवाड याची पोलीस चौकशी करणार. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शिर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिव्या देणाऱ्या, आईबहिणी वरून अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातसुद्धा अभद्र बोलणाऱ्या आ. संजय गायकवाड याची चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने पोलिसांना दिलेली आहे. दरम्यान कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रशांत आंबी तर्फे आम्ही मागणी केलेली आहे कि या संदर्भात संजय गायकवाडवर दखलपात्र गुन्हा नोंदवावा. संजय गायकवाड याना आता कळेल कायदेशीरता पाळणे म्हणजे छात्रपती शिवाजी राजेंचा सन्मान करणे आहे.
