24 वर्षीय युवकाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू:शेतातील वीज दुरुस्त करताना घडली घटना

0
b8bfb5a5-2fbd-4dc1-a20d-b9deee3e620c_1779638336948.jpg




चांदूर रेल्वे येथील सावंगी संगम परिसरात शेतातील वीजपुरवठा दुरुस्त करत असताना वीजेचा धक्का लागून २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अंकुश श्रावणजी नेवारे असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हा डीजे व्यवसायासोबतच विद्युत संबंधित छोटी-मोठी कामे करत असे. त्याच्या कुटुंबाची हडपा शिवारात सुमारे दोन एकर शेती असून, शेतातील मंदिराच्या बांधकामासाठी पाणी सुरू व्हावे, या उद्देशाने तो वीजपुरवठा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होता. शुक्रवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजताच्या सुमारास अंकुश शेताजवळील ११ केव्ही विद्युत पोलवर चढून जंपर बदलण्याचे काम करत होता. संबंधित लाईन दररोज सायंकाळी चार वाजता बंद होऊन सहा वाजता सुरू होते, असा त्याचा समज होता. मात्र, अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने त्याला वीजेचा जोरदार धक्का बसला. यात तो खांबावरच लटकलेल्या अवस्थेत मृत झाला. घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले आणि त्यांनी अंकुशला खांबावरून खाली उतरवले. याबाबत चांदूर रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चांदूर रेल्वे येथे आणण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. अंकुशच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed