Bhimashankar Temple | श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ‘या’ दिवशी सुरू होण्याची शक्यता! प्रशासनाने दिली महत्वाची माहिती

0
Bhimashankar-Mandir-Closed.webp.webp


Bhimashankar Temple | श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर येथे सुरू असलेल्या विकासकामांमुळे मंदिर 31 मे 2026 पर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता या कामांचा अंतिम टप्पा सुरू असून 1 जूनपासून मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले होणार का, याकडे राज्यभरातील शिवभक्तांचे लक्ष लागले आहे. 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या काळात भीमाशंकर येथे मोठी गर्दी अपेक्षित असल्याने जुन्या सभामंडपाचे क्षेत्र अपुरे पडत होते. त्यामुळे नवीन भव्य सभामंडप उभारण्यासह विविध सुविधा विकसित करण्यासाठी तब्बल 288.17 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार मंदिर परिसरात सभामंडप, घुमट, पायरी मार्ग, लाईटिंग आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

9 जानेवारी 2026 पासून मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. आता कामे अंतिम टप्प्यात पोहोचल्याने जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग आणि मंदिर ट्रस्टकडून प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. रविवारी मंदिर परिसरातील सुरक्षा, मार्गव्यवस्था आणि भाविक सुविधांचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतर मंदिर सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

देवस्थानकडून प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या देखील करण्यात आल्या आहेत. महाद्वार ते पहिली पायरीपर्यंत स्टील बॅरिकेटिंग, दक्षिण बाजूस सुरक्षित मार्ग, ऑनलाइन पास विभागाजवळील जिन्याची दुरुस्ती आणि CCTV तसेच PA सिस्टिम पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Bhimashankar Temple | भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य :

मंदिर परिसरातील लाईटिंग पूर्ववत करणे, पाणी साचणार नाही यासाठी पीसीसी काम पूर्ण करणे आणि पायरी मार्गावर मजबूत पत्र्याचे आच्छादन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नवीन सभामंडपातील तिन्ही दरवाजांवर लॉक व्यवस्था बसवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय मंदिर सुरू झाल्यानंतर VIP प्रोटोकॉलवर मर्यादा आणाव्यात आणि सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था मिळावी, अशी अपेक्षा देवस्थानकडून व्यक्त करण्यात आली आहे. 31 मेपर्यंत सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच मंदिर भाविकांसाठी खुले करावे, अशी देवस्थानची भूमिका आहे.

News Title : Will Bhimashankar Temple Reopen From June 1? Administration Reviews Development Works Ahead of Kumbh Mela

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed