काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांच्या दबावानंतर आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत:सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने पाणीटंचाईच्या मुद्द्यावर प्रशासनाला धरले धारेवर

0
app_17795432646a11ace09a23b_1003266064.jpg




चिखली गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या चिखलीकरांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला अखेर यश आले आहे. प्रशासनाने तातडीने हालचाली करत आजपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला आहे. शहरात १५ ते २० दिवसांनी होणारा पाणीपुरवठा, नागरिकांची वाढती गैरसोय आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपरिषद प्रशासनाला थेट इशारा दिला होता. त्यानंतर काल झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने पाणीटंचाईच्या मुद्द्यावर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत जाब विचारला. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. “चिखलीकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असताना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे,” असा आरोप करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल केला. या पार्श्वभूमीवर आज पहाटे इसरार, प्रकाश शिंगणे, अमोल लहाने, गोकुळ शिंगणे, गोपाल देव्हडे, रत्नदीप शिनगारे, उबेद अली खान, आनंद बोन्द्रे, प्रशांत भटकर, संतोष देशमुख, पी. एस. वायाळ यांनी थेट चिखली नगरपरिषदेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रावर धडक देत प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी पाणी शुद्धीकरण केंद्रातील संपूर्ण यंत्रणा, जलसाठा, वितरण व्यवस्था तसेच शहरातील विविध भागातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना नियमित, सुरळीत व वेळेवर पाणीपुरवठा करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावामुळे प्रशासनाने अखेर कामाचा वेग वाढवत आवश्यक उपाययोजना केल्या आहे. आजपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. “चिखलीकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष सुरूच राहील. नागरिकांना वेठीस धरणारा कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही,” असा इशाराही यावेळी विरोधी पक्षाच्या वतीने देण्यात आला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी शुद्धीकरण केंद्रावर धडक देत प्रत्यक्ष पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed