मोफत महाआरोग्य शिबिरात 18,631 जणांची तपासणी:जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत एकदिवसीय शिबिराचे आयोजन
![]()
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरात १८ हजार ६३१ जणांची तपासणी व उपचार करण्यात आले. ‘जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत’ हे एकदिवसीय शिबिर पुणे शहरासह राज्याच्या विविध भागांतील रुग्णांसाठी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १३७ प्रकारच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. रुग्णांना साहित्य व औषधे देखील वाटप करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील ९० रुग्णालये आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी या शिबिरात अखंड ९ तास सेवा दिली. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या डॉ. अंजली टिळेकर, डॉ. संजीव डोळे, डॉ. संदेश पटवर्धन, तसेच ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ट्रस्टच्या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पणही करण्यात आले. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, प्रत्येकाच्या आरोग्याची योग्य वेळेत चाचणी होणे आवश्यक आहे, ज्यामुळे भविष्यातील दुष्परिणाम टाळता येतील. विकसित, संतुलित, समृद्ध, सुविद्य आणि सक्षम भारतासाठी ट्रस्टचे रुग्णसेवेचे कार्य आशादायी आहे. आमदार हेमंत रासने म्हणाले की, विकसित भारत घडवण्यासाठी प्रत्येक नागरिक निरोगी असणे महत्त्वाचे आहे. नागरिकांना निरोगी ठेवण्याच्या दृष्टीने ट्रस्ट आरोग्य सेवा देत आहे. हे महाआरोग्य शिबिराचे दुसरे वर्ष असून, यातून हजारो शस्त्रक्रिया व उपचार मोफत करण्यात आले आहेत. रुग्णसेवेचे हे कार्य यापुढेही सातत्याने सुरू राहील. या महाआरोग्य शिबिरासाठी सुमारे १५ हजार नागरिकांनी नोंदणी केली होती. शिबिरात हृदयविकार, किडनी, नेत्रविकार, दंत उपचार, स्त्रीरोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबिर, ईएनटी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, अस्थिरोग, विविध थेरपी, रेडिओलॉजी, श्रवण आणि स्पीच थेरपी यांसारखे उपचार विनामूल्य करून देण्यात आले.
