मानसिक आजार मोकळेपणाने स्वीकारा:आयरा खानचे आवाहन, स्वतःच्या संघर्षाचा अनुभव मांडला

0
d03f6516-9881-4674-8114-aa0dfe629a93_1779627110299.jpg




पुण्यात जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त ‘जाऊ आनंदाच्या गावा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार भवन येथे झालेल्या या कलाविष्कारात स्किझोफ्रेनियासारख्या तीव्र मानसिक आजाराशी संघर्ष करणाऱ्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या आयरा खान यांनी मानसिक आजार मोकळेपणाने स्वीकारण्याचे आवाहन केले. अगास्तू फाउंडेशनच्या संस्थापक, थिएटर दिग्दर्शक आणि मानसिक स्वास्थ्य कार्यकर्त्या आयरा खान यांनी स्वतःच्या मानसिक आजाराशी सुरू असलेल्या संघर्षाचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. कला आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संबंधांवरही त्यांनी प्रकाश टाकला. औषधोपचारांसह आजार स्वीकारून विविध टप्प्यांवर मानसिक आजारांबाबत प्रबोधन करण्याचे काम त्या आणि त्यांची संस्था करत असल्याची माहिती त्यांनी दिली. मनाचे आजार मोकळेपणाने स्वीकारल्यास आणि योग्य मदत घेतल्यास अनेक प्रश्न सोपे होतात, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे आयोजन परिवर्तन संस्था संचालित ‘मानसरंग’ आणि ‘किरण गट’ यांच्या वतीने करण्यात आले होते. परिवर्तन संस्थेचे संचालक डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, स्किझोफ्रेनियाशी संघर्ष करणाऱ्या रुग्णमित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सध्या कोणतीही प्रभावी यंत्रणा उपलब्ध नाही. परिवर्तन संस्था ‘मानसरंग’ आणि ‘किरण गट’ यांच्या माध्यमातून अशी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यक्रमाला स्किझोफ्रेनिया आजाराला सामोरे जाणारे मानसमित्र आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी यावेळी मनोगीते, मनोनृत्य आणि मनोगते सादर केली. रेश्मा कचरे यांनी स्वागत केले, तर मुक्ता देशपांडे, चंद्रकिरण पारुंडेकर आणि सुरेश डुंबरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आयरा खान यांनी त्यांच्या डिप्रेशनच्या अनुभवाविषयी बोलताना सांगितले की, या आजाराविषयी पुरेशी माहिती नसल्याने तो ओळखायला त्यांना वेळ लागला. याचा त्यांच्या शिक्षण आणि करिअरवरही परिणाम झाला. मात्र, आता योग्य औषधे आणि सायकोथेरपीमुळे त्या पुन्हा आनंदाने आयुष्य जगत आहेत. स्वतःच्या या अनुभवामुळे त्यांना इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed