Pune Airport | WHO कडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी जाहीर! ‘या’ आजाराच्या भीतीने पुणे विमानतळ सतर्क
Pune Airport | जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोला संसर्गासंदर्भात आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केल्यानंतर देशभरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही खबरदारीच्या सूचना दिल्या असून पुणे (Pune) विमानतळावर विशेष उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
इबोला (Ebola) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळ प्रशासनाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. बँकॉक (Bangkok) आणि दुबई (Dubai) येथून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी केली जात आहे. तसेच विमानातच प्रवाशांना सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म देण्यात येत असून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली जात आहे.
संशयित लक्षणे आढळल्यास संबंधित प्रवाशांना तातडीने विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक धोका असलेल्या प्रवाशांना पुढील उपचार आणि तपासणीसाठी पुण्यातील नायडू रुग्णालयात (Naidu Hospital) पाठवले जाणार आहे. विमानतळावरील कर्मचाऱ्यांना पीपीई किटचा वापर, संसर्ग नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वतंत्र कक्षामध्ये पीपीई किट परिधान केलेले कर्मचारी तपासणी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या पुणे विमानतळावर इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
Pune Airport | इबोला विषाणूचा संसर्ग कसा होतो? :
इबोला हा गंभीर विषाणूजन्य आजार असून तो प्रथम 1976 मध्ये आफ्रिका (Africa) खंडात आढळून आला होता. तज्ज्ञांच्या मते, हा विषाणू प्रामुख्याने वटवाघळांपासून मानवांमध्ये पसरतो. संक्रमित व्यक्तीच्या रक्त, घाम, लाळ, उलटी, मूत्र, विष्ठा तसेच इतर शारीरिक द्रव्यांच्या थेट संपर्कातून संसर्ग होऊ शकतो. संक्रमित व्यक्तीने वापरलेले कपडे, अंथरूण, सुया किंवा वैद्यकीय उपकरणांमधूनही हा विषाणू पसरू शकतो. लैंगिक संबंध तसेच मातेकडून बाळालाही संसर्ग होण्याची शक्यता असते.
इबोलाची सुरुवातीची लक्षणे ताप, डोकेदुखी, घशात खवखव, उलट्या आणि जुलाब अशी असतात. गंभीर अवस्थेत रुग्णामध्ये रक्तस्त्राव आणि अवयव निकामी होण्यासारखे परिणाम दिसून येऊ शकतात. या आजाराचा मृत्यूदर 50 टक्क्यांपर्यंत असू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र, श्वसनमार्गातील विषाणूंप्रमाणे इबोला हवेतून पसरत नाही. त्यामुळे संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कापासून दूर राहणे, विलगीकरण आणि संसर्ग नियंत्रणाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
