घोरपडीच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना वाईत बेड्या!:सापळा रचून वनविभागाची धडक कारवाई, वाई तालुक्यातील घटना

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-24t201936843_1779634235.jpg




वाई तालुक्यात वनविभागाने रचलेल्या सापळ्यात घोरपड व अन्य वन्यजीवांच्या अवयवांची अवैध तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे वन्यजीव अवयवांच्या बेकायदेशीर व्यापाराचा पर्दाफाश झाला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा यांना २३ मे रोजी घोरपडीच्या अवयवांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वाई वनपरिक्षेत्रातील कर्मचारी तसेच सातारा फिरते पथक यांच्या मदतीने कोचळेवाडी हद्दीत वाई–तेमढे रस्त्यावरील एका हॉटेल परिसरात सापळा रचण्यात आला. संध्याकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास मारुती सुझुकी वॅगनआर (एमएच १४ एचडब्ल्यू ०५०६) या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाहनातून घोरपडीच्या मानेपासून तोंडापर्यंतचा अवयव, नर घोरपडीचे चार जननेंद्रिय अवयव (हत्ताजोडी), वाघ अथवा बिबट्यासदृश प्राण्याचे नख तसेच समुद्री वन्यजीवांशी संबंधित ‘इंद्रजाल’ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महेश सूर्यकांत व्होनफडे (वय २६, रा. तांबवे, ता. माळशिरस) व रोहन गजानन कदम (वय २३, रा. तांबवे-भवानीनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून रोख १५ हजार रुपये, दोन मोबाईल फोन तसेच तस्करीसाठी वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. दोघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाई न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची वनकोठडी सुनावली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी, वाई करीत आहेत. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, विभागीय वनाधिकारी (दक्षता) संजय वाघमोडे आणि सहायक वनसंरक्षक प्रदीप रोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वनपाल संग्राम मोरे, धोंडीबा बोडके तसेच वाई वनपरिक्षेत्र आणि फिरते पथकातील अधिकारी-कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनीही महत्त्वाची मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed