घरफोडी करणारे दोन चोरटे जेरबंद:18 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त, फरासखाना पोलिसांची कारवाई

0
c0d3a24a-b8ff-4757-8fe3-ddd8e00df3a9_1779627648339.jpg




कसबा पेठेत घरफोडी करून पसार झालेल्या दोन सराईत चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १८ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने (वय ३३, रा. वेताळनगर, चिंचवड) आणि रामा उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय ३३, रा. गौर वाघोली, ता. कळंब, जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी ६ मार्च रोजी कसबा पेठेतील पवळे चौकातील एका सोसायटीतील बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरी केली होती. या घरफोडीत शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरण्यात आला होता. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान पोलीस हवालदार गजानन सोनुने यांना सराईत चोरटे माने आणि क्षीरसागर यांनीच ही घरफोडी केल्याची माहिती मिळाली. सोनुने यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपींना ओळखले होते. घरफोडी केल्यानंतर दोन्ही आरोपी दिल्ली, आग्रा, अयोध्या, झाशी, लातूर, बार्शी अशा विविध शहरांमध्ये फिरले. अखेर ते छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले असता, तेथील स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून त्यांना अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवप्रकाश मुळे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, महेश राठोड, प्रवीण पासलकर, विशाल शिंदे, नितीन जाधव, महेश पवार, चेतन होळकर आणि सुमीत खुट्टे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed