
मागच्या शनिवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंची जाहीर सभा झाली. त्यावर बरेच काही छापून आले आहे. त्या वेळच्या भाषणात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक बाब रंगवून सांगितली. ती होती जळगावच्या सुरेश जैन यांच्यासंदर्भात. १९९९ मध्ये सुरेश जैन यांना मुख
.
जून १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. अर्थातच, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढले. परिणामी दोन्ही काँग्रेसच्या निवडून आलेल्या आमदारांची एकत्रित संख्या मोजली जात नव्हती. काँग्रेसचे ७५ उमेदवार निवडून आले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ५८ उमेदवार. ते एकत्र आले असते तर १४५ या जादुई आकड्यासाठी त्यांना केवळ १२ आमदार कमी पडत होते. भाजप-शिवसेना मात्र युती म्हणून लढले होते. भाजपचे ५६ तर शिवसेनेचे ६९ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीकडे होते अवघे १२५ आमदार. बहुमतासाठी त्यांना २० आमदार कमी पडत होते. भाजपने अपक्ष आणि इतरही काही पक्षांच्या आमदारांना जमवून तो आकडा १३९ पर्यंत नेला तरीही सहा आमदार कमीच होते. आधीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करायचे, असे भाजपने ठरवले होते. त्या परिस्थितीत सहा आमदार खेचून आणायची तयारी मुंडेंनी केली होती; पण शिवसेनेचे जास्त आमदार असल्याने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, नारायण राणे यांना कमी काळ मिळालेला असल्याने त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करायचे ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. त्यामुळे बहुमत कुणाकडेच होत नव्हते. निवडणुकीचे निकाल लागून १५ दिवस झाले तरीही कुणी सरकार स्थापनेचा दावा करीत नव्हते आणि राज्यपालही कुणाला बोलावू शकत नव्हते. अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागण्याची किंवा फेरनिवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता वाढत होती. भाजपला ते नको होते. त्यामुळे भाजपने वेगळे मार्ग जोखायला सुरुवात केली आणि जळगावचे आमदार सुरेश जैन पुढे आले. आपण मुख्यमंत्री झालो तर इतर पक्षांतील १० आमदार (जैन/मारवाडी समाजाचे) साथ द्यायला तयार आहेत आणि त्यासाठी त्यांची आमदारकी गेली तरी त्यांना चालणार आहे, असा दावा जैन यांनी केला. हे १० आमदार मतदानावेळी अनुपस्थित राहतील असा प्लॅन होता. भाजपने ते मान्य केले. तो प्रस्ताव बाळासाहेबांच्या कानावर घालून त्यांची संमती मिळवायची, असे ठरवून भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि आणखी दोन जण असे चार जणांचे शिष्टमंडळ मातोश्रीवर गेले. खडसे सांगतात की, तिथे त्यांची बाळासाहेबांशी चर्चा झाली. त्यांनी सर्व म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पहिला प्रश्न विचारला तो खडसे यांना. ‘तुला सुरेश जैन मुख्यमंत्री झालेला चालेल का?’ या प्रश्नावर ते काय उत्तर देणार? त्यांच्या मुख्यमंत्री होण्याने शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर येणार असेल तर माझी काही हरकत नाही, असे खडसे यांनी सांगितले. मग बाळासाहेब म्हणाले, ‘पण मला चालणार नाही. या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर मराठीच माणूस असला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. व्यापारी मनोवृत्तीचा माणूस मुख्यमंत्री होता कामा नये.’ बाळासाहेबांच्या या भूमिकेमुळे युतीचे सरकार सत्तेत आलेच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अखेर सत्तेसाठी एकत्र आल्या आणि त्यांनी सरकार बनवले. उत्तर महाराष्ट्राची संधी गेली ती गेलीच.