नांदेड(प्रतिनिधी)-रेती/वाळू या विषयाशी आमचा काही संबंध नाही अशी वल्गना पोलीस विभाग करत असतो. परंतू काल दि.4 फेबु्रवारीचा सुर्योदय होण्यापुर्वी महसुल विभागाने अवैध वाळु उत्खननावर कार्यवाही केली. त्याचवेळेस पोलीस विभागाने त्यापेक्षा चार पटीने मोठी कार्यवाही करून 2 कोटी 39 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधिक्षकांना दुचाकीवर प्रवास करावा लागला. याचा अर्थ असा नक्कीच घ्यावा लागेल की, यापुढे अवैध रेती उत्खनन होणार नाही आणि अवैध वाळु वाहतुक होणार नाही.
नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार स्वत: दुचाकीवर गेले ज्या रस्त्याने चार चाकी वाहन जाऊ शकत नाही. कारण त्या ठिकाणी पुढे नदीमध्ये अवैध रेती उत्खनन केले जाते. पोलीस ठाणे भोकर, सोनखेड, लिंबगाव आणि नांदेड ग्रामीण या पोलीस ठाण्याच्या हद्दीत संयुक्त कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये पोलीसांनी 16 सेक्शनपंप जप्त केले. त्यांची किंमत 64 लाख रुपये आहे. 60 तराफे जप्त केले त्यांची किंमत 21 लाख रुपये आहे. एक जेसीबी जप्त केला 50 लाख रुपयांचा. 200 ब्रास काळी वाळू जप्त केली किंमत 10 लाख रुपये आणि 6 मोठ्या बोट जप्त केल्या. त्यांची किंंमत 60 लाख रुपये, तीन छोट्या बोट जप्त केल्या त्यांची किंमत आहे 9 लाख रुपये, रेतीसह एक हायवा जप्त केली त्याची किंमत आहे 25 लाख 20 हजार रुपये. ही सर्व कार्यवाही राहटी, भनगी, पेनुर, बेटसांगवी, थुगाव, वाहेगाव, गंगाबेट, कल्लाळ आदी ठिकाणी करण्यात आली. वाळु माफियांचा हा कारभार उघड करतांना यात बिलोली, देगलूर,धर्माबाद, मरखेल, मुक्रामाबाद आदी भागांमध्ये सुध्दा मोठे वाळु माफीया आहेत आणि त्या ठिकाणी वाहणाऱ्या नद्यांमधून सुध्दा अवैध वाळू उत्खनन सुरूच असते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यवाहीत पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, ओमकांत चिंचोळकर, अजित कुंभार, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, आनंद बिचेवार यांच्यासह पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, सोनखेड, उस्माननगर येथील पोलीस अंमलदार, पोलीस ठाणे शिवाजीनगर, वजिराबाद आणि इतवारा येथील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार आरसीपी आणि क्युआरटी प्लॉटून आदींनी मेहनत घेतली.
Leave a Reply