नांदेड(प्रतिनिधी)-जे लोक सत्तेत बेधुंद झाले आहेत, ज्यांनी डोळ्याला कपडे बांधले आहेत. मी गरीबाचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याचे त्यांच्या पचनी पडले नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आज जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडला आले होते. प्रथम त्यांनी सचखंड श्री हजुुर साहिब येथे जाऊन दर्शन घेतले आणि आशिर्वाद प्राप्त केले. त्यानंतर नवा मोंढा मैदानावरील सभेला संबोधीत करतांना ते बोलत होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर ना.गुलाबराव पाटील, आ.बालाजीराव कल्याणकर, आ. बाबुराव कदम कोहळीकर, आ.आनंदराव बोंढारकर यांची उपस्थिती होती. सर्व प्रथम दिपप्रज्वलन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मविर आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.
या प्रसंगी पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मी सी.एम. होतो तेंव्हा मी कॉमन मॅन होतो आणि आज मी डीसीएम आहे म्हणजे मी सर्वसामान्य माणसाला समर्पित व्यक्ती आहे. मी काल सुध्दा कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि पुढे सुध्दा कार्यकर्ताच राहणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांना मोठे करणे माझे काम आहे. जनतेने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना मोठे करावे अशी माझी इच्छा आहे. मी गरीबाचा मुलगा मुख्यमंत्री झालो हे बेधुंद झालेल्या लोकांना, ज्यांनी डोळ्यावर कापडे बांधली आहेत. त्यांना पचले नाही असे सांगितले. नांदेड विकासाचा आराखडा नव्याने तयार करू आणि एक जबरदस्त विकास प्रक्रिया नांदेडमध्ये नव्याने उभारु, मी दिलेल्या कोणत्याही योजना बंद पडणार नाहीत. माझ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या युवकांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी आणि लाडक्या ज्येष्ठांनी 100 टक्के निकाल दिला आणि 100 टक्के स्ट्राईक रेड दिला. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. माझ्या बहिणींनी सावत्र भावांना नुसता जोडाच दाखवला नाही तर तो हाणला सुध्दा. स्वत:च्या खुर्चीसाठी शिवसेना कॉंगे्रसच्या दावणीला बांधली असा आरोप करतांना शिंदे यांनी कोणाचे नाव घेतले नाही. माझ्या शिवसेनेला लोकसभेत 2 लाख मतदान जास्त मिळाले आणि विधानसभेत 15 लाख मतदान जास्त मिळाले यावरुन स्पष्ट होत की, खरी शिवसेना कोणाची आहे.
ना.गुलाबराव पाटील, आ.बालाजी कल्याणकर, आ.बाबुराव कदम, कोहळीकर आणि आनंद बोंढारकर यांची समयोचित भाषणे झाली. त्यात बालाजी कल्याणकर यांना टोमणे मारत ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, मंत्री असतांना माझ्या मतदार संघासाठी एकनाथ शिंदे यांनी 2500 कोटी रुपये दिले आणि तुम्ही कोणती जादु केली. ज्यामुळे तुम्हाला 3500 कोटी रुपये दिले. आ.बालाजी कल्याणकर यांनी आमदारकीच्या पहिल्या सत्रातील अडीच वर्षात झालेला त्रास मांडला आणि यापुढे माझ्याकडे जास्त लक्ष असावे अशी विनंती केली. आ.बाबुराव कदम यांनी आपल्या मतदार संघाच्या काही मागण्या सादर केल्या. आ.आनंदराव बोंढारकर यांनी मी नवीनच आहे आ.बालाजी कल्याणकरसारखे प्रेम माझ्यावरही ठेवा अशी अपेक्षा व्यक्त केली.
गरीबाचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे अनेकांच्या पचनी पडले नाही-एकनाथ शिंदे

Leave a Reply