नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना कालखंडात तु माझ्याकडे का पाहिलास या क्षुल्लक कारणावरुन एका 22 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्या तीन जणांपैकी एकाला जन्मठेप शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि तर दोघांना एक वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा देण्याचे आदेश तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी जारी केले आहे.
दुशांत दौलत जोंधळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.12 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास त्यांचा लहान भाऊ सिध्दार्थ दौलत जोंधळे (22) हा ऍटो चालकाचे काम करतो तो राजकॉर्नर येथे आपला ऍटो घेण्यासाठी गेला. तेथे अजय उर्फ बंटी संजय लोणे(21) रा.दिपकनगर तरोडा (बु),रवि रमेश हाडसे(36) रा.त्रिरत्ननगर सांगावी आणि अतिश सुरेश चव्हाण(25) रा.लिंबगाव ह.मु.दिपकनगर तरोडा (बु) हे तिघे तु आमच्याकडे रागाने का पाहतोस अशी विचारणा सिध्दार्थ जोंधळेला केली. परंतू सिध्दार्थने यावर काही उत्तर दिले नाही. तेंव्हा त्या तिघांनी त्याला मारहाण केली. मारहाणीची माहिती दुशांत जोंधळेला सिध्दार्थने फोनवरून सांगितली. तेंव्हा दुशांत आणि त्याचे चुलत बंधू शुभम आणि विजय तेथे पोहचले. त्या तिघांच्यासमोर सुध्दा सिध्दार्थला मारहाण सुरू राहिली. तेंव्हा दुशांत आणि इतरांनी त्यांना वेगळे केले तेंव्हा पाठीमागच्या बाजूने येवून रवि हाडसेने पुन्हा एकदा त्याला मारहाण सुरू केली आणि तेवढ्यात अजय उर्फ बंटी संजय लोणेने आपल्या कंबरेला असलेला चाकू काढून सिध्दार्थच्या छातीवर डाव्या बाजून चाकू खुपसला. तसेच लगेच तो बाहेर काढून दुसरा वार गळ्यावर करत असतांना तो सिध्दार्थने चुकवला आणि तो वार सिध्दार्थच्या हनवटीवर लागला. त्वरीत ऍटोमध्ये घेवून एका खाजगी रुग्णालयात गेलो असतांना त्यांनी कोविडमुळे सिध्दार्थला घेतले नाही. दुसऱ्या दवाखान्यात गेलो तेथेही सिध्दार्थला उपचार मिळाला नाही आणि आम्ही जखमी सिध्दार्थला घेवून शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे गेलो तेंव्हा डॉक्टरांनी तपासणी करून तो अगोदरच मरण पावला असल्याचे सांगितले. या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 370/2020 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 नुसार दाखल केला. या गुन्ह्यात पुढे भारतीय हत्यार कायद्याची वाढ झाली. या गुन्ह्याचे तपास भाग्यनगरचे तत्कालीन पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांनी केला.
तिन्ही आरोपींना अटक करून सखोल तपास करून अभिमन्यु साळुंके यांनी न्यायालयात तिघांविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. या तिघांपैकी रवि हाडसे आणि अतिश चव्हाण या दोघांना न्यायालयाने जामीन दिला होता. परंतू अजय उर्फ बंटी संजय लोणेला जामीन दिला नाही. आज निकालाच्या दिवशी पर्यंतही तो तुरूंगातच आहे. न्यायालयात ही घटना सत्र खटला क्रमांक 15/2021 नुसार न्यायालयीन प्रक्रियेत आली. न्यायालयात एकूण 6 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. या प्रकरणाचा सरकारी पक्षाच्यावतीने युक्तीवाद करतांना सहाय्यक सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी अत्यंत उत्कृष्ट मांडणी केली.
उपलब्ध पुराव्याच्या आधारावर तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी मारेकऱ्यांपैकी अजय उर्फ बंटी संजय लोणे यास जन्मठेप आणि १० हजार रुपये रोख दंड, रवि रमेश हाडसे आणि अतिश सुरेश चव्हाण या दोघांना एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये रोख दंड अशा शिक्षा ठोठावल्या. या खटल्यात भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार सादिक पटेल यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.
Leave a Reply