हॉल तिकिटाचा डाटा ४०० डॉलरसाठी हॅक

महत्वाच्या बातम्याएकमत ऑनलाईन

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेले संयुक्त पूर्व परीक्षेचे तब्बल ९४१९५ हॉल तिकीट बेकायदेशीररित्या डाऊनलोड करून सदर हॉल तिकीट टेलिग्राम चॅनलवर बेकायदेशीररीत्या प्रसारीत करणा-या रोहित दत्तात्रय कांबळे (१९) या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पुणे येथून अटक केली.

या प्रकरणातील आरोपी रोहित कांबळे हा डार्कनेट वरील काही हॅकर्ससोबत संपर्कात असल्याचे आढळून आले असून त्यांच्याकडून त्याला एमपीएसीच्या वेबसाईटवरून परीक्षार्थींचे हॉल तिकीट व एमपीएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका हॅक करण्यासाठी तब्बल ४०० डॉलरची सुपारी मिळाल्याचे तपासात आढळून आल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ब आणि गट कच्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या परीक्षार्थींचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) २८ एप्रिल रोजी आपल्या वेबसाईटवर टाकले होते. सदरचे हॉल तिकीट हे विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बा लिंकद्वारे आयोगाच्या वेबसाईटवर टाकण्यात आले होते. मात्र याच गोष्टीचा फायदा उचलत अज्ञात हॅकरने या बा लिंकमध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश करुन त्यातील माहिती अवैधरित्या प्राप्त केली आणि त्याद्वारे वेबसाईटवरील तब्बल ९४१९५ परीक्षार्थींचे हॉल तिकीट डाऊनलोड केले.

त्यानंतर सदर हॅकरने आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड केलेला परीक्षार्थ्यांच्या हॉल तिकिटाचा डाटा एमपीएससी २०२३ ए या टेलिग्रामच्या चॅनलवर बेकायदेशीरीत्या प्रसारीत केला होता. या प्रकारानंतर एमपीएसीच्या परिक्षार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले होते.

सायबर सेलकडे दिली होती तक्रार
यासंदर्भात आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या प्रकरणाचा सखोल तांत्रिक तपास करून पुण्यात रोहित कांबळे याला अटक केली.

साहित्यही केले जप्त
आयपी अ‍ॅड्रेस मिळवून तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी रोहित दत्तात्रय कांबळे याला पुण्यातील चिखली, पाटीलनगर येथून बुधवारी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी रोहित कांबळे याच्या घरातून सदर गुन्ह्यात वापरलेले १ डेस्कटॉप, १ लॅपटॉप, ३ मोबाईल फोन व एक इंटरनेट राउटर जप्त केले. चौकशीदरम्यान रोहित कांबळे याने त्याच्या साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *