एकमत ऑनलाईन
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला असून मिग २९ के या विमानाने रात्रीच्या अंधारात आयएनएस विक्रांतवर लँडिंग करुन इतिहास रचला आहे. भारतीय नौदलाने या विमानाच्या रात्रीच्या लँडिंगचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हे यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने आणखी एक पाऊल असल्याचं भारतीय नौदलाने स्पष्ट केले आहे.
मिग २९ के जेट हे विक्रांतच्या फायटर फ्लीटचा भाग आहे. मिग २९ के लढाऊ विमान हे अत्याधुनिक विमान आहे, जे कोणत्याही हवामानात उडू शकते. ते आवाजाच्या दुप्पट वेगाने (ताशी २००० किमी) उडू शकते. ते स्वतःच्या वजनापेक्षा आठपट जास्त भार वाहून नेण्यास सक्षम आहे. ६५००० फूट उंचीवर ते उडू शकते.
रात्रीच्या वेळी विमानवाहू जहाजावर विमान उतरवणे नौदलासाठी आव्हानात्मक मानले जाते. कारण विमानवाहू वाहक ४०-५० किमी/ताशी वेगाने पुढे जात असते आणि वैमानिकांना जेटच्या वेगाशी ताळमेळ राखावी लागते.
यापूर्वी तेजस विमानाने आयएनएस विक्रांतवर यशस्वीपणे उतरण्याची कामगिरी केली होती, मात्र तेजस विमानाचं लँडिंग हे दिवसा करण्यात आलं होतं. याशिवाय २८ मार्च रोजी कामोव ३१ हेलिकॉप्टरही आयएनएस विक्रांतवर उतरवण्यात आले होते.
मिग-२९ के लँडिंगबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, आयएनएस विक्रांतवर मिग-२९ के पहिल्या रात्रीच्या लँडिंगची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल मी भारतीय नौदलाचे अभिनंदन करतो. ही उल्लेखनीय कामगिरी म्हणजे विक्रांत क्रू आणि नौदलाच्या वैमानिकांच्या कौशल्य, दृढता आणि व्यावसायिकतेची साक्ष आहे.
आयएनएस विक्रांत पहिली स्वदेशी विमानवाहू नौका
आयएनएस विक्रांत ही भारतात बांधलेली, स्वदेशी पहिली विमानवाहू नौका आहे. ही नौका केरळमधील कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये बांधण्यात आली होती. या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचे नाव भारतातील पहिल्या विमानवाहू वाहक आयएनएस विक्रांतच्या नावावरून ठेवण्यात आले. ४५,००० टनाची आयएनएस विक्रांत २०,००० कोटी रुपये खर्चून बांधली गेली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ती नौदलात सामील झाली होती.