Corona| सावधान महाराष्ट्र, कोरोना वाढतोय, रुग्णसंख्या तीन हजार पार; पहा सविस्तर

कृषी


Corona | कोरोना (Corona) संकटातून देश आता कुठं सावरत असतानाच कोरोनानं पुन्हा एकदा आपलं अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. देशभरात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रासाठीही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 694 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत कोरोनाचे 3016 सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. ही संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे महाराष्ट्राची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.

असं असलं तरीही रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे. हे प्रमाण 98.14 टक्के इतकं आहे. गेल्या 24 तासात राज्यात एकूण 184 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात फक्त कोरोनाच नव्हे तर एच 3 एन 2, एच 1 एन 1 आणि इन्फ्लुएन्झा (Influenza) रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

महाराष्ट्रात कोरोना सोबतच इतर साथीच्या रोगांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. इन्फ्लुएंझा, एच 3 एन 2, एच 1 एन 1 आजारात बरीच वाढ दिसून आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला आवाहन केले आहे. गर्दीची ठिकाणे टाळा, मास्क वापरा, सॅनिटायझरने (Sanitizer) हात स्वच्छ धुवा, दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर (Social Distancing) ठेवा असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. तसेच काळजी करण्याचं काही कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यातील ऑक्सिजनचा साठा

राज्यात एकूण 523 ऑक्सिजन (Oxygen) प्लांट्स आहेत. या प्लांट्स मधून 552 मॅट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती केली जाऊ शकते. राज्यात सध्या 1000 ड्युरा सिलेंडर आहेत. तसेच 56 हजार 551 जम्बो सिलेंडर, 20 हजार छोटे सिलेंडर, 370 एमएलडी लिक्विड ऑक्सिजन टँक्स आहेत. राज्यात उपचारांसाठी 1588 कोरोना रुग्णालये आहेत. तसेच 49 हजार 396 ऑक्सिजन बेड 9 हजार 236 व्हेंटिलेटर बेड, 14,395 आयसीयू बेड आणि 51 हजार 365 विलगीकरण खाटा आहेत.

देशातील कोरोनाची स्थिती

सबंध देशभरातही कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सध्या 16 हजार 354 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. दिल्ली, कर्नाटक आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरात मध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *