कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये जेव्हा समंथाने हजेरी लावली होती, तेव्हा घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया हा कडवटपणाचा अनुभव देणारा होता, असं ती म्हणाली. नाग चैतन्य आणि समंथा रुथ प्रभूने ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट जाहीर केला.

Samantha and Naga Chaitanya
Image Credit source: Instagram
हैदराबाद : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिच्या करिअरमधील पहिलावहिली आयटम साँग केला. ‘ऊ अंटावा’ हे तिचं गाणं तुफान गाजलं. आजही पार्ट्यांमध्ये हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. मात्र समंथाचे कुटुंबीय, जवळचे मित्रमैत्रिणी आणि शुभचिंतकांनी तिला हे गाणं न करण्याचा सल्ला दिला होता. नाग चैतन्यसोबत घटस्फोट जाहीर केल्यानंतर लगेचच तिला ही ऑफर मिळाली होती. म्हणूनच घटस्फोटानंतर लगेच तिने असं काही करू नये, असं त्यांचं म्हणणं होतं. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथा मोकळेपणे व्यक्त झाली.