कुणाल नायरच्या या कमेंटनंतर माधुरी आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांचा पारा चढला आहे. अशा अपमानकारक शब्दांचा वापर करणं चाहत्यांना अजिबात आवडलं नाही. यामुळे मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे.

Madhuri, Jaya and Aishwarya
Image Credit source: Facebook
मुंबई : ‘बिग बँग थिअरी’ या हॉलिवूडच्या प्रसिद्ध शोवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या शोमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांची अत्यंत वाईट पद्धतीने तुलना करण्यात आली. याप्रकरणी राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यांनी हा शो स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी केली आहे. या शोमध्ये माधुरी दीक्षितवर केलेली कमेंट अत्यंत अपमानकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय. याप्रकरणी आता ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कुणाल नायरवर त्या भडकल्या असून त्याला मनोरुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला आहे.