स्मृती इराणी यांनी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत तुलसीची भूमिका साकारली होती. या मालिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याच वेळी त्या ‘रामायण’ या मालिकेत देवी लक्ष्मी आणि सीता या भूमिका साकारत होत्या.

Smriti Irani
Image Credit source: Facebook
नवी दिल्ली : अभिनेत्री आणि राजकारणी स्मृती इराणी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गर्भपाताच्या घटनेविषयीचा खुलासा केला. गर्भपातानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या सेटवर परतण्यास सांगितलं होतं. त्यावेळी स्मृती यांनी निर्माती एकता कपूरला वैद्यकीय कागदपत्रं दाखवत खरंच गर्भपात झाल्याचं सिद्ध करावं लागलं होतं. कारण एका सहकलाकाराने एकताला सांगितलं होतं की स्मृती गर्भपाताबद्दल खोटं बोलतेय. त्याचवेळी त्या ‘रामायण’ या मालिकेसाठीही काम करत होत्या. या मालिकेचे दिग्दर्शक रवी चोप्रा यांना जेव्हा स्मृती यांच्या गर्भपाताविषयी समजलं, तेव्हा त्यांनी आराम करण्यास सांगितलं होतं.