एका मुलाखतीत सोनाली महिलांबद्दल म्हणाली, “भारतात, आपण अनेकदा ही गोष्ट विसरतो की अनेक महिला फक्त आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो तो खूप चांगला कमावतो, ज्याचं स्वत:चं घर आहे आणि ज्याला कामाच्या ठिकाणी चांगली बढती मिळते.”

Sonali Kulkarni
Image Credit source: Twitter
मुंबई : ‘दिल चाहता है’, ‘मिशन काश्मीर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सोनालीच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ती महिलांना ‘आळशी’ असं म्हटल्याने नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सोशल मीडियावरील ठराविक वर्गाला तिची ही टिप्पणी नकारात्मक वाटल्याने तिच्यावर टीकांचा भडीमार झाला. यानंतर आता सोनालीने ट्विटरवर भलीमोठी पोस्ट लिहित जाहीर माफी मागितली आहे. या घटनेतून मी खूप काही शिकले, असंही तिने या पोस्टच्या अखेरीस लिहिलं आहे.